जळगाव : राज्यातील गृहराज्यमंत्री, कृषीमंत्री आणि जलसंपदामंत्री यांनी शेतकरी व जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात तीन मंत्र्यांच्या प्रतिमांचा निषेध नोंदवत बॅनरला चुना लावून संताप व्यक्त करण्यात आला.
सोमवार (दि. २१ जुलै) रोजी दुपारी १ वाजता झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी केले. महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (अजित पवार गट), गृहराज्यमंत्री योगेश कदम (शिंदे गट) आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. या तिन्ही मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांनी आरोप केला की, रोज महाराष्ट्रात ८ शेतकरी आत्महत्या करीत असताना कृषीमंत्री विधानभवनात ‘ऑनलाईन जंगली रम्मी’ खेळत आहेत. गृहराज्यमंत्री कदम यांच्या आईच्या नावे डान्सबार चालवला जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच भाजप नेते प्रफुल्ल लोढा यांच्यावर हनी ट्रॅप आणि पॉक्सो अंतर्गत झालेल्या अटकेबाबतही सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
आंदोलनाप्रसंगी तालुका अध्यक्ष प्रमोद घुगे, अशोक आप्पा सोनवणे, किरण ठाकूर, प्रभाकर कोळी, धनराज वारडे, रघुनाथ सोनवणे, स्वप्नील पाटील, खुशाल पाटील, राजू पाटील, अनिल बोरसे, नितीन चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.