जळगाव

Jalgaon news | पाळधीचा महामार्ग की मृत्यूचा सापळा? भरधाव वेगाने घेतला एकाचा बळी

प्रशासनाला जाग येणार कधी? विश्वजित पाटलांच्या नेतृत्वाखाली जळगाव-संभाजीनगर हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; गतिरोधक आणि अतिक्रमणावरून रणकंदन

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव-संभाजीनगर महामार्गावरील पाळधी गावानजीक आज दुपारी रक्ताचा सडा पडला. प्रशासकीय ढिसाळपणा आणि हायवेवरील अनियंत्रित वेगाने एका निष्पाप जीवाचा बळी घेतला असून, अन्य तिघेजण मृत्यूशी झुंज देत आहेत. या भीषण अपघातानंतर पाळधीतील ग्रामस्थांचा संयम सुटला असून, संतप्त नागरिकांनी महामार्गावर 'रास्तारोको' करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. स्थानिक नेते विश्वजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी गाव महामार्गाला लागूनच असल्याने या ठिकाणी वाहने नेहमीच सुसाट असतात. आज दुपारी एका भरधाव वाहनाने नियंत्रण गमावल्याने समोरून येणाऱ्यांना भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, एकाचा जागीच अंत झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

प्रशासनाचा निगरगट्टपणा नडला?

पाळधी परिसरात वारंवार अपघात होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्राधिकरण कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. "येथे गतिरोधक (स्पीडब्रेकर) बसवा, हायवेवरील अतिक्रमण हटवा," अशी मागणी वारंवार करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. याच नाकर्तेपणामुळे आजचा अपघात घडल्याची भावना जनसामान्यांमध्ये आहे. महामार्गालगत वाढलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला असून, त्यात भरधाव वेगाची भर पडल्याने हा भाग 'डेथ ट्रॅप' बनला आहे.

विश्वजित पाटलांचा रणशिंग!

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नेते विश्वजित पाटील यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. केवळ आश्वासनांवर समाधान न मानता त्यांनी थेट रस्त्यावर ठाण मांडले. "जोपर्यंत गतिरोधकांचे काम सुरू होत नाही आणि मृताच्या वारसांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हटणार नाही," असा पवित्रा पाटील यांनी घेतल्याने पोलिसांचीही धावपळ उडाली. आंदोलनामुळे जळगाव आणि संभाजीनगरकडे जाणारी शेकडो वाहने अडकून पडली आहेत.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:

१. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला तातडीने भरीव आर्थिक मदत मिळावी.

२. जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा.

३. पाळधी परिसरात तातडीने शास्त्रोक्त पद्धतीने गतिरोधक बसवावेत.

४. महामार्गालगतचे वाढलेले सर्व अतिक्रमण २४ तासांच्या आत जमीनदोस्त करावे.

प्रशासनाला इशारा

जर प्रशासनाने या मागण्यांकडे पुन्हा दुर्लक्ष केले, तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र असेल आणि होणाऱ्या परिणामांना प्रशासनच जबाबदार राहील, असा सज्जड इशारा आंदोलकांनी दिला आहे. सध्या पोलिसांकडून आंदोलकांशी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT