जळगाव

Jalgaon News | बियाणे, खतांचा कृत्रिम तुटवडा रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय, तालुकानिहाय नोडल अधिकारी नियुक्तीचे आदेश

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सद्यस्थितीत बियाणे आणि खतांचा कोणताही तुटवडा नसला तरी संपूर्ण खरीप हंगामात बियाणे आणि खते यांचा कोणताही तुटवडा भासू नये या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे. कृत्रिमरीत्या निर्माण केला जाणारे तुटवड्याचे प्रमाण रोखण्यासाठी तालुका निहाय नोडल अधिकारी यांची नियुक्ती करुन पुरवठा व विक्री यांचेवर लक्ष ठेवावे असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात शुक्रवार १४ जून रोजी जिल्ह्यातील घाऊक बियाणे खते विक्रेते व कंपनी प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा कृषी विकास अधिकारी सूरज जगताप आदी. उपस्थित होते.

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी जिल्ह्यातील उपलब्ध बियाणे व खत साठा याची माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात कुठेही एमआरपी पेक्षा जादा दराने बियाणे आणि खतांची विक्री होणार नाही याची काळजी विक्रेते आणि कृषी विभागाने देखील घ्यावी. घाऊक विक्रेत्यांनी देखील दररोज त्यांचे कडे खते आणि बियाण्यांचा किती साठा उपलब्ध आहे ते जाहीर करावे. कृषी विभागाने देखील विक्रेते निहाय विक्री झालेला माल आणि शिल्लक साठा व शेतकऱ्यांची मागणी याची खात्री करून अद्याप ज्या भागात पेरण्या झाल्या नाहीत त्या भागातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन बियाणे व खते यांच्या साठ्याचे नियोजन करावे अशा सूचना श्री. अंकित यांनी या वेळी दिल्या. बियाण्यांचा तुटवडा बाजारपेठेत जाणवू लागताच बोगस बियाणे मोठ्या प्रमाणात दाखल होते. हाच प्रकार खताच्या बाबतीत देखील असतो त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बोगस बियाणे बाजारपेठेत दाखल होता कामा नये व शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेणे महत्वाचे आहे. जळगांव जिल्ह्यात कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. मात्र त्या सोबतच शेतकरी कडधान्य पिकाची आंतर पीक म्हणून मोठी लागवड करणार असल्याची बाब लक्षात घेऊन मुग, उडीद, तसेच मका आणि सोयाबीन याच्या बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचा सूचना देखील श्री. अंकित यांनी यावेळी दिल्या.

उत्पादनक्षम वाणांची खरेदी

यावेळी उपस्थित कंपनी प्रतिनिधी यांनी मागणी प्रमाणे योग्य तो पुरवठा केला जात असून कोणत्याही बियाण्यांचा तुटवडा सध्या जिल्ह्यात नसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी देखील विशिष्ट कंपनीच्याच वाणाचा आग्रह न धरता उत्पादनक्षम वाणांची खरेदी करून पेरणी करावी असे आवाहन देखील या वेळी करण्यात आले .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT