जळगाव : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि.23) रोजी जैन हिल्स येथे पार पडली. अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन आणि अधिकृत निरीक्षक ए. के. रायजादा यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर 2025 ते नोव्हेंबर 2028 या काळासाठी नवीन कार्यकारणीची निवड झाली.
यामध्ये गोंदियाचे डॉ. परिणय फुके यांची अध्यक्षपदी तर पुण्याचे निरंजन गोडबोले यांची मानद सचिवपदी निवड झाली. जळगावातून सिद्धार्थ मयूर यांची कार्याध्यक्ष तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे रविंद्र धर्माधिकारी यांची सहसचिव म्हणून निवड झाली आहे.
ग्रॅंडमास्टर विदित गुजराथी, ग्रॅंडमास्टर अभिजीत कुंटे, महिला ग्रॅंडमास्टर सौम्या स्वामीनाथन आणि ग्रॅंडमास्टर स्वाती घाटे हे खेळाडू प्रतिनिधी म्हणून काम पाहणार आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. चंद्रशेखर जामदार यांनी कामकाज पाहिले. राज्यभरातील जिल्हा प्रतिनिधी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी अशी...
अध्यक्ष – डॉ. परिणय फुके (गोंदिया)
कार्याध्यक्ष – सिद्धार्थ मयूर (जळगाव)
सरचिटणीस – निरंजन गोडबोले (पुणे)
खजिनदार – भरत चौगुले (कोल्हापूर)
उपाध्यक्ष – सुनील रायसोनी (नागपूर), चिदंबर कोटीभास्कर (सांगली), श्रीराम खरे (रत्नागिरी)
सहसचिव – सतीश ठाकूर (जालना), डॉ. दीपक तांडेल (ठाणे), अश्विन मुसळे (चंद्रपूर)
नियुक्त सदस्य – राजेंद्र कोंडे (उपाध्यक्ष), अंकुश रक्ताडे (सहसचिव), रविंद्र धर्माधिकारी (सहसचिव – जळगाव)
निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी अभिनंदन केले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, राज्यात बुद्धिबळाच्या एका नवीन, संघटित प्रवासाची सुरुवात झाली आहे. खेळाडूंना सक्षम करणारे उपक्रम राबवण्यासाठी आणि महाराष्ट्रात सक्षम बुद्धिबळपटू घडवण्यासाठी नवीन कार्यकारिणीने लक्षपूर्वक प्रयत्न करावेत.