जळगाव : आषाढी एकादशी वारीसाठी श्री संत मुक्ताई पालखी जुन्या कोथळी मंदिरातून शुक्रवारी (दि. 6) दुपारी ३.३० वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करती झाली. यावेळी आमदार एकनाथ खडसे यांनी रथाची धुरा सांभाळत 'विठ्ठल'नामाच्या घोषात तल्लीन झाल्याचे दिसून आले.
आषाढी एकादशीसाठी दुपारी जुन्या कोथळी मंदिरातून संत मुक्ताईची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. पालखी सोहळा प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषाने मुक्ताईनगरी दुमदुमली होती. पालखीचा पहिला मुक्काम नवीन मुक्ताई मंदिरात राहणार आहे. वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत मुक्ताईच्या पादुका पंढरपूरला ३३ दिवसांचा ७५० किलोमीटरचा पायी प्रवास तसेच वारी दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेश करते. संत मुक्ताईंच्या दिंडीला तीन शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील संत मुक्ताई संस्थानाच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते. दिंडीचे यंदाचे ३१६ वे वर्षे आहे. आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वर व देहूतून निघणारी संत तुकोबांच्या दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीलादेखील आहे.
आषाढी एकादशीला पंढरपुरात भरणाऱ्या यात्रेसाठी विठ्ठल रखुमाईसह संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तिनाथ, संत तुकोबारायांच्या भेटीसाठी मुक्ताई निघतात, अशी वारकऱ्यांची भावना आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची दिंडी म्हणून संत मुक्ताईच्या दिंडीची ओळख आहे. संत मुक्ताईची दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत ३३ दिवसांत तब्बल ७५० किलोमीटरचे अंतर कापत पंढरपुरात दाखल होते. तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती तसेच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडविली जाते. यावेळी संत मुक्ताईला साडीचोळीचा आहेर भावांकडून भेट दिला जातो. पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो.