जळगाव : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६० लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, अनेक ठिकाणी शेती पूर्णपणे वाहून गेली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मदत पॅकेज जाहीर झाले असले तरी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद पेटला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे एका बँकेच्या शाखा उद्घाटनावेळी बोलताना त्यांनी लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो. लोकांनी काय मागायचं हे ठरवायला हवे, असे वक्तव्य केल्याने शेतकरीवर्गात संतापाची लाट उसळली आहे.
राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्जमाफीची मागणी होत असतानाच मंत्री पाटील यांच्या वक्तव्याने जखमेवर मीठ चोळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही बाबासाहेब पाटील यांनी जळगाव दौऱ्यात आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मंत्रिपदावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यामुळे त्यांचे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
दरम्यान, वाद वाढल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, मी स्वतः शेतकरी आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. कर्जमाफीचा उल्लेख मी केवळ बँकेच्या कर्जप्रक्रियेच्या संदर्भात केला होता. शेतकरी मात्र या स्पष्टीकरणाने समाधानी नसून त्यांनी मंत्री पाटील यांना आपल्या वक्तव्याबद्दल सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली.