जळगाव : जामनेर तालुक्यातील शहापूर गावात एका विहिरीत लपलेल्या बिबट्याला पकडताना झालेल्या थरारक झटापटीनंतर, वनविभागाच्या ताब्यात असलेल्या ५ ते ६ वर्षीय मादी बिबट्याचा तब्बल चार ते पाच तासांनंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीतून अचानक बाहेर पडून एका तरुणावर हल्ला करणाऱ्या या बिबट्याला शेतकऱ्यांनी धाडसाने पकडले होते. मात्र, या झटापटीत बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. वनविभागाच्या जामनेर कार्यालयात कायदेशीर पंचनामा करून मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार (दहन) करण्यात आले.
जामनेर तालुक्यातील शहापूर शिवारातील एका शेतातील विहिरीत बिबट्या लपल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभाग आणि स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला जेरबंद करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, पिंजरा लावण्यापूर्वीच बिबट्याने अचानक विहिरीतून बाहेर झेप घेतली आणि समोर उभ्या असलेल्या तरुणावर थेट हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्याने भयभीत न होता, त्या तरुणाने आणि उपस्थित शेतकऱ्यांनी बिबट्याला जागीच दाबून धरले आणि अत्यंत शिताफीने त्याला वनविभागाच्या ताब्यात दिले.
बिबट्याला ताब्यात घेतल्यानंतर वनविभागाने त्याला तातडीने पिंजऱ्यात हलवले आणि जामनेर येथील कार्यालयात आणले. तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, तपासणी सुरू असतानाच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या बिबट्याला मृत घोषित केले.
"बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अंतर्गत रक्तस्राव आणि जबर मार लागल्यामुळेच या ५ ते ६ वर्षे वयाच्या मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची रीतसर नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे."— सूरज आवारे, वनपरिक्षेत्राधिकारी, जामनेर
बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन (Post-Mortem) करून बिबट्याच्या मृत्यूचे अधिकृत कारण शोधण्याचे काम करण्यात आले. दरम्यान, जामनेर येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारातच सर्व शासकीय नियमांचे पालन करत मृत बिबट्यावर दहन संस्कार करण्यात आले. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींमधून हळहळ व्यक्त होत असून, वन्यजीवांना रेस्क्यू (बचाव) करताना वनविभागाची यंत्रणा आणखी सक्षम असण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.