जळगाव : जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिस्त असलेल्या आरोपींकडून काही आक्षेपार्ह वस्तू सापडतात का, यासाठी मंगळवार (दि.3) रोजी सकाळी विशेष झाडाझडती मोहीम राबवण्यात आली.
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध शाखांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. मात्र, तपासणीत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नसल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी दिली.
या झाडाझडती मोहिमेत डॉग स्कॉड, क्यूआरटी, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), जिल्हा पेठ पोलीस ठाणे तसेच जिल्ह्यातील इतर पोलिस स्टेशनमधील कर्मचारी सहभागी झाले होते. नुकतेच एलसीबीचे पदभार स्वीकारलेले संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली.
जळगावमधील मध्यवर्ती कारागृह हे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असून सध्या तेथे क्षमतेपेक्षा अधिक आरोपी ठेवले गेले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी कोणतीही गैरप्रकार किंवा आक्षेपार्ह गोष्टी घडू नयेत म्हणून ही झाडाझडती राबवण्यात आली. संपूर्ण कारागृहाची बारकाईने तपासणी करण्यात आली. तपासणीत कोणतीही प्रतिबंधित किंवा संशयास्पद वस्तू सापडली नसली, तरी या कारवाईमुळे कारागृहामध्ये चांगलीच धडकी भरली आहे. पुढील काळात अशा घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.