Girish Mahajan Pudhari
जळगाव

Girish Mahajan on Delimitation : राजकारणात काहीही अशक्य नाही; शरद पवारांचा एनडीए प्रवेश, राज ठाकरेंवर गिरीश महाजन यांची फटकेबाजी!

​"राज ठाकरेंकडे फक्त फौज आहे, सेनापती नाही", शरद पवार यांच्या पक्षाचा परिसीमन विधेयकाला पाठींबा

पुढारी वृत्तसेवा

​जळगाव : "देशातील डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) बिलासाठी संपूर्ण देश एकत्र आला असून शरद पवार यांचा पक्ष आणि डीएमकेनेही आमच्या बाजूने पाठिंबा दर्शवला आहे. राजकारणात आता काहीही अशक्य राहिलेले नाही," असे महत्त्वपूर्ण विधान मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे माध्यमांशी बोलताना केले आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या संभाव्य एनडीए (NDA) प्रवेशाबाबत सूचक भाष्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.

​पवार गटाच्या एनडीए प्रवेशाचे संकेत?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) भविष्यात एनडीएमध्ये सहभागी होणार का, या प्रश्नावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, "हा पुढचा प्रश्न असून आज त्याबाबत कोणीही काही सांगू शकत नाही. मी तेवढा मोठा नेता नाही, याचा निर्णय दिल्लीतूनच ठरेल. मात्र, सर्व दक्षिण भारतातील पक्ष आज मोदींच्या समर्थनासाठी आमच्या बाजूने उभे राहिले आहेत, असे कोणाला वाटले होते का? पण ते शक्य झाले आहे. त्यामुळे राजकारणात काहीही अशक्य राहिलेले नाही." डिलिमिटेशन मुद्द्यावर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी शरद पवार यांचे आभारही मानले.

​विरोधकांकडे केवळ काँग्रेस आणि उबाठा शिल्लक राहतील

विरोधी आघाडीवर टीका करताना महाजन यांनी दावा केला की, "डिलिमिटेशन बिलासाठी आमची बहुमताची पूर्ण तयारी झाली असून हे बिल नक्कीच पारित होईल. आता विरोधकांकडे केवळ काँग्रेस आणि उबाठा (ठाकरे गट) हे दोनच पक्ष उरतील. काँग्रेस आणि संजय राऊत यांनी कितीही बडबड केली तरी त्याला काही अर्थ नाही. त्यांच्या बाजूने आता कोणीही राहिलेले नसून केवळ तोंडसुख घेणे आणि वायफळ बडबड करणे याव्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीही शिल्लक नाही."

​"राज ठाकरेंकडे फक्त फौज आहे, सेनापती नाही"

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानांबाबत विचारले असता गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. "राज ठाकरे तर काहीही बोलू शकतात. त्यांच्याकडे फक्त फौज आहे, पण सध्या कोणी सेनापती नाही. त्यांची टोळी आहे, त्यामुळे त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार आहे," असा टोला महाजन यांनी लगावला. तसेच आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यांबाबत विचारले असता, "ते काय बोलतात याची तुम्हाला कल्पना आहे, त्यामुळे मी त्याबद्दल काहीही बोलणार नाही," असे म्हणत त्यांनी भाष्य करणे टाळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT