जळगाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले (छाया : नरेंद्र पाटील)
जळगाव

Jalgaon News | पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्पातील पाडळसी जलसिंचन योजना जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे योजना पूर्णत्वाच्या टप्यात आली आहे. तसेच वाघूर प्रकल्प उपसा सिंचन प्रणालीच्या टप्पा क्रमांक 1 व 2 ला मान्यता मिळाली असून वरखेड लोंढे आणि शेळगाव बॅरेजलाही मान्यता मिळाल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलीताखाली येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ध्वजारोहण प्रसंगी दिली.

  • भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  • पाडळसी जलसिंचन प्रकल्प ,वाघूर उपसा सिंचन, वरखेड लोंढे आणि शेळगाव बॅरेज मुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलीताखाली येणार - पालकमंत्री गुलाबराव पाटील

  • जिल्ह्याचा ई - चावडी प्रकल्पात विभागात पहिला क्रमांक

भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे , सहायक जिल्हाधिकारी (प्रशिक्षणार्थी) वेवोतोलू केझो, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, विविध शासकीय विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हजारो युवतींचे फक्त पैशामुळे उच्च शिक्षण थांबणार नाही याची पुरेपुर काळजी शासनाने घेतली आहे. युवक, युवतीचे पुढचं भवितव्य घडविण्यासाठी कौशल्य व आर्थिक ताकत निर्माण व्हावी म्हणून राज्य शासनाने मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. यासाठी जळगाव जिल्हयात आतापर्यंत विविध आस्थापना, कंपन्याकडून 4630 पदे अधिसुचित झाली आहेत. उमेद‌वारांकडून ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. संबंधित आस्थापनांकडून रुजू आदेशाची कार्यवाही सुरु आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी नावीन्यपूर्ण अशी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर शासनाने ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत जिल्हयात आतापर्यंत 17485 लाभार्थी पात्र ठरले आहेत. या योजनेसाठी 65 वर्ष, पूर्ण झाली आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करता येणार असल्याची माहितीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

सन 23-24 या खरिप हंगामात स्थानिक आपत्तीमुळे 2 लाख 49 हजार 488 शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्याच्या भरपाई पोटी 132 कोटी 74 लाख एवढी रक्कम पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. तर उत्पन्नावर आधारित 3 लाख 87 हजार 973 शेतकऱ्यांना 523 कोटी 28 लाख मंजूर झाले असून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु असल्याची महिती पालकमंत्र्यांनी दिली.

ई - चावडी प्रकल्पात विभागात जिल्हा प्रथम

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याने सर्व गावांची 100 टक्के मागणी ई चावडी प्रणाली मध्ये नोंदणी केली. त्यामुळे ई -चावडी अंमलबजावणी मध्ये नाशिक विभागात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आला आहे,

शेतकरी बांधवांच्या अत्यंत उपयुक्त प्रकल्पासाठी उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाचे यावेळी विशेष अभिनंदन करण्यात आले.

पोलीस प्रशासनाच्या बळकटी करणासाठी दिलेल्या निधीचा उल्लेख करून कायदा व सुव्यस्था अधिक मजबूत होणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT