जळगाव

Jalgaon News | जळगावात पहिल्यांदाच ‘बुलडोझर पॅटर्न’; ड्रग्स माफिया रईस देशमुखच्या बेकायदेशीर साम्राज्यावर मनपाचा हातोडा!

६ लाखांच्या एमडी ड्रग्स प्रकरणातील आरोपींना दणका; पोलीस छावणीत अतिक्रमण जमीनदोस्त, फरार आरोपीही रडारवर!

पुढारी वृत्तसेवा

जळगाव ः शहरातील बहुचर्चित एमडी ड्रग्स रॅकेट प्रकरणी जळगाव जिल्हा पोलीस आणि महानगरपालिकेने संयुक्तपणे आजवरची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य अटकेत असलेला आरोपी रईस हसन देशमुख याच्या एमआयडीसी परिसरातील नियमबाह्य आणि अतिक्रमित घरावर आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने थेट जेसीबी चालवला. जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात अंमली पदार्थ तस्कराच्या बेकायदेशीर मालमत्तेवर अशा प्रकारे ‘बुलडोझर पॅटर्न’ राबवण्याची ही पहिलीच वेळ असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वीच छापा टाकून ६ लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले होते, ज्यामध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं ४७७/२०२६ NDPS कायद्यान्वये नुसार अटकेत असलेला आरोपी रईस हसन देशमुख (वय २७, रा. सुप्रिम कॉलनी) याने शासकीय नियमांची ऐशीतैशी करत घरातच बेकायदेशीरपणे दुकानांचे पक्के बांधकाम केले होते. एमआयडीसी पोलीस निरीक्षकांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहून आरोपींच्या मालमत्तेची चौकशी करण्याची अधिकृत मागणी केली होती.

या पत्राची तात्काळ दखल घेत, आज मनपाच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक आणि पोलिसांच्या प्रचंड ताफ्यासह सुप्रिम कॉलनी गाठली. कोणतीही सवलत न देता, आरोपीच्या घरासमोरील पक्के व्यावसायिक बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने काही मिनिटांत जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई पाहण्यासाठी परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

स्थानिक गुन्हे शाखेने या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करत आतापर्यंत ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, तर २ जण अद्याप फरार आहेत. पोलिसांनी केवळ गुन्हे दाखल करून न थांबता, या अमली पदार्थ तस्करांचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी मनपा आयुक्त साहेबांना थेट पत्र पाठवले होते. या गुन्ह्यात खालील आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, त्यांच्या मालमत्तांची चौकशी सुरू आहे:

ड्रग्ज रॅकेटमधील आरोपी

रईस हसन देशमुख (वय २७, रा. सुप्रिम कॉलनी) - ज्याचे घर आज पाडण्यात आले.

तौसिफ आसिफ सय्यद (वय २१, रा. पिंप्राळा हुडको)

कुणाल उर्फ लकी रमेश पाटील (रा. देविदास कॉलनी)

अमजद उर्फ बिल्डर शेख (रा. फातेमा नगर)

इम्रान उर्फ इमा हुसेन भिस्ती (रा. शाहू नगर)

अन्वर पटेल (रा. सुप्रिम कॉलनी)

जळगाव पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे ड्रग्स विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. आज केवळ एका आरोपीवर कारवाई झाली असली, तरी पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या खात्रीशिर माहितीनुसार, उद्या (मंगळवारी) या गुन्ह्यातील इतर अटकेत असलेल्या आणि फरार आरोपींच्या देखील नियमबाह्य आणि अतिक्रमित असल्यास त्याच्या घरांवर मनपाचा हातोडा चालणार आहे. जळगाव शहराला ड्रग्समुक्त करण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल गुन्हेगारांची झोप उडवणारे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT