अग्निशामक दलाचे वाहने
नगरपालिकेच्या कार्यालयातील अग्निशामक दलाचे वाहने ही व्यापारी संकुलनात उभी आहेत. (छाया : नरेंद्र पाटील)
जळगाव

Jalgaon News | भुसावळ नगरपालिकातील अग्निशमन बेवारस

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यामधील 'अ' दर्जा प्राप्त असलेली भुसावळ नगरपालिका सद्यस्थितीत अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. नगरपालिकेची स्वतःची इमारत नसल्यामुळे व्यापारी संकुलातून नगरपालिकेचा कारभार सुरू आहे. त्यात एमआयडीसी, रेल्वे व लोकसंख्येनुसार नागरिकांच्या वाढत्या वस्त्या खेड्यापर्यंत पोहचल्याने शहराची हद्द वाढली आहे.

मात्र वाढत्या लोकसंख्येनुसार शहर परिसरात कुठे आग लागल्यास अग्निशामक बंब वेळेवर त्या ठिकाणी पोहचण्यास वेळ लागू शकतो अशी येथील रस्त्यांची अवस्था झालेली आहे. त्यासाठी अग्निशामक दलाचे झोन वन व झोन दोन करण्याची आवश्यकता असताना अग्निशामकचे एक स्टेशन बेवारस पडलेले असून त्याची दयनीय अवस्था झालेली आहे.

भुसावळ शहराच्या जामनेर रोडवरील दुरावस्थेत असलेले फायर स्टेशन

खानदेशात मुख्यतः जळगाव जिल्ह्यात भुसावळ नगरपालिकेला 'अ' दर्जा प्राप्त आहे. या नगरपालिकेचा इतिहास सर्वाधिक जुना असून सद्यस्थितीत नगरपालिकेची दयनीय अवस्था झालेली पहावयास मिळत आहे. नगरपालिकेला स्वत:च्या हक्काच्या मालकीची इमारत देखील नाही. अग्निशामक दल आहे परंतु त्यांना देखील वाहने ठेवण्यासाठी किंवा पाणी भरण्यासाठी सोयीची अशी मुबलक जागा उपलब्ध नाही. शिवाय जिथे फायर स्टेशन आहे ते तोडके मोडके झालेले आहे. त्यामुळे वाहने, कर्मचारी असून त्यांना स्टेशन किंवा पाण्यासाठी जागाच नाही. अशी अवस्था भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाची झालेली आहे.

भुसावळ शहराच्या जामनेर रोडवरील दुरावस्थेत असलेले फायर स्टेशन

भुसावळ शहरामधून रेल्वेची लाईन गेल्यामुळे दोन दोन विभागात शहर विभागले गेलेले आहेत. त्यातच राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले असून शहराचे देखील विभाजन झालेले आहे. शहराचा वाढता विस्तार व शहराला लागून असलेली एमआयडीसी यामुळे भुसावळ अग्निशामक दलावर मोठी जबाबदारी आहे. शहराची मुख्य बाजारपेठ ही शहराच्या मध्यवर्ती भागात असून या भागातून जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे. कारण अग्निशामक दलाची मोठी वाहने जाण्यासाठी मामाची टॉकीज किंवा गवळी वाडा येथील एकच रस्ता असल्याने या ठिकाणी बाराही महिने दिवसरात गर्दी असते. अशा गर्दीच्या वेळी कोणत्या परिसरात आग लागली आणि येथील रस्त्यावर वाहने जर अडकली तर आगीमुळे मोठे नुकसान होण्याची संभाव्य शक्यता आहे. तसेच जीवितावरही बेतू शकते. दुसरा मार्ग राष्ट्रीय महामार्गाने शहराला वेडा घालून आग लागलेल्या ठिकाणी जाता येईल, परंतु हे खूप मोठ्या फेऱ्याचे अंतर पडते

शहरात काही वर्षांपूर्वी बनवलेल्या स्टेशन बेवारस पडलेले आहेत. येथे दुरूस्ती करून त्या ठिकाणी अग्निशामक दलाचे वाहने पार्क करुन ठेवल्यास शहरातील एका भागाला सोयीचे होईल व दुसरा भाग हा रस्त्याला लागून असलेल्या शाळेच्या ठिकाणी किंवा नगरपालिकेच्या सध्याच्या इमारतीमध्ये असल्याने सोयीचे पडेल. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात काही मोठी हानी झाल्यास त्यास जबाबदार भुसावळ नगरपालिका राहील की प्रशासन राहील असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

SCROLL FOR NEXT