Jalgaon News : Finally, the power distribution company bowed down to the farmers' protest!
जळगाव : पुढारी वृत्तसेवा गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वीज खंडिततेच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी आज महावितरण समोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एक आगळेवेगळे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आक्रमक आंदोलनापुढे महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी जळगाव ग्रामीण, चाळीसगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना सलग ८ तास वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
आंदोलनादरम्यान शेतकरी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महावितरणसमोर प्रामुख्याने दोन मागण्या मांडल्या : शेतकऱ्यांना विनाखंडित सलग १० तास वीजपुरवठा मिळालाच पाहिजे. विद्युत कायदा २००३ च्या कलम ४३ आणि ५७ नुसार सुरळीत वीज मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला खंडित वीजपुरवठा हा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या गुणवत्ता मानकांचा थेट भंग आहे.
"वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. हा महावितरणचा मनमानी कारभार असून एम इ आर सी च्या नियमांची पायमल्ली आहे. जर हा वीजपुरवठा त्वरित सुरळीत झाला नाही, तर आम्ही 'सीजीआरएफ' , विद्युत लोकपाल आणि थेट ग्राहक मंचात महावितरणविरोधात कोट्यवधी रुपयांच्या भरपाईसाठी दावा दाखल करू!" -
आंदोलनाचा वाढता आक्रमक पवित्रा पाहून महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. जळगाव ग्रामीण आणि चाळीसगाव परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विनाखंडित सलग ८ तास वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. केवळ तोंडी आश्वासन न देता महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी या संदर्भातील अधिकृत लेखी प्रत आंदोलनकर्त्यांना सुपूर्द केली. यामुळे आजचे हे ठिय्या आंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.
या आंदोलनात शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पिताताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी, एजाज मलिक, महेश बोरसे, महानगर तालुकाध्यक्ष रिंकू चौधरी, संग्राम पाटील, प्रेमराज राठोड, योगेश पाटील, डॉ. रमाकांत कदम, प्रमोद सोनवणे, स्वप्नील राजपूत, सुमित सपकाळे, संजय जाधव, वाय. एस. महाजन, हिलाल पाटील, बाळू धनगर, बाळू पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधव अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होते.