जळगाव : इच्छेदेवी चौक ते तरसोद फाटा हा जळगाव शहराला भुसावळ, तरसोद आणि राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु या रस्त्याची दुरावस्था झाली असून संपूर्ण रस्ताच पट्टा खड्ड्यांनी व्यापला आहे. वाहनधारकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) दिल्यानंतरही कामाची गती अत्यंत संथ गतीने सुरु आहे.
रस्ता की खड्डे? वाहनचालकांचा संभ्रम
जळगाव–भुसावळदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. परंतु या मार्गावर मोठ्ठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांना पायवाट शोधत जावे लागत आहे. चारचाकी वाहनांना वारंवार गती कमी करावी लागते. इंधनाची नासाडी, वेळेची अपव्यय आणि अपघातांचा धोका वाढत आहे.
रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, हेच कळत नाही. NHAI ने सुरू केलेले काम दोन फुटांवरच थांबले आहे. पुढचे काम कधी सुरू होणार याचा काहीच पत्ता नाही. शहराच्या प्रवेशद्वाराची ही अवस्था लाजिरवाणी आहे.एक वाहनचालक
या रस्त्याबाबत NHAI यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी असून रस्त्याचे दोन फुटांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे सुरू आहे. येत्या मार्च 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.श्री. तायडे, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी
पण प्रत्यक्षात रस्त्याच्या दहा फुटांपैकी फक्त दोन फुटांचेच काँक्रीटकरणाचे काम झाल्याचे दिसून येत आहे. उर्वरित काम सुरू न झाल्याने रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेतच पडून आहे. कामाचा वेग पाहता येत्या मार्च 2026 पर्यंत तरी या खड्ड्यांपासून मुक्ती मिळेल का ? असे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
इच्छादेवी ते तरसोद फाटा हा शहराचा प्रवेशमार्ग असल्याने येथे व्यवस्थित रस्ता असणे अत्यावश्यक आहे. नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा कधी मिळणार, याबाबत सर्वांचे लक्ष NHAI आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लागले आहे. मार्चची फक्त तारीख देण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला वेग देणे तातडीचे झाले आहे.