BSNL Network Issue (Pudhari File Photo)
जळगाव

Jalgaon news | 5G च्या वल्गना करणाऱ्या बीएसएनएलचे धिंडवडे; हातनूर धरणावरील 'ती' ऐतिहासिक रिंग कायमची शांत

देखभालीचे कारण पुढे करत सरकारी कंपनीची पळवाट; जळगावची जीवनवाहिनी आता खाजगी कंपनीच्या दावणीला

पुढारी वृत्तसेवा

नरेंद्र पाटील

जळगाव : एकीकडे केंद्र सरकार आणि सरकारी दूरसंचार कंपनी 'बीएसएनएल' (BSNL) देशात ५जी क्रांतीच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या हातनूर धरणावरील आपला एकमेव महत्त्वाचा टेलिफोन सांभाळण्यात या कंपनीला अपयश आले आहे.

गेल्या अनेक दशकांपासून उन्हाळा असो वा पावसाळा, मंत्र्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना धरणाची माहिती देणारा २७७०४४ हा सहा अंकी क्रमांक आता कायमचा बंद झाला असून, त्या जागी एका खाजगी कंपनीचा १० अंकी क्रमांक सुरू करण्यात आला आहे. सरकारी यंत्रणेचा हा 'कामचुकारपणा' की खाजगी कंपन्यांचे उखळ पांढरे करण्याचा डाव, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

प्रशासकीय संपर्क यंत्रणेचा कणा मोडला

हातनूर धरणावरील हा टेलिफोन केवळ एक नंबर नव्हता, तर तो जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्तालय, मंत्रालय आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील महत्त्वाचा दुवा होता. धरणाचे दरवाजे किती उघडले? विसर्ग किती आहे? पाऊस किती झाला? या प्रश्नांची उत्तरे याच रिंगवर मिळत होती. मात्र, आता बीएसएनएलने 'आम्ही या लाईनचे मेंटेनन्स करू शकत नाही' असे सांगून ही सेवाच गुंडाळली आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी सरकारी यंत्रणा असणे अनिवार्य आहे, तिथेच सरकारी कंपनीने हार मानली आहे.

खाजगी कंपनीची घुसखोरी आणि बीएसएनएलचे अपयश

बीएसएनएलने आपल्या चुकांमुळे आणि अकार्यक्षमतेमुळे आधीच ग्राहक गमावले आहेत. आता तर सरकारी कार्यालयांमधूनही ही कंपनी पळ काढत असल्याचे चित्र आहे. धरणावर ग्राहक संख्या कमी असल्याचे अजब तर्कट अधिकाऱ्यांनी लावले आहे. मात्र, एक ग्राहक असला तरी ती जागा 'हातनूर धरण' सारखी संवेदनशील आहे, याचे भान बीएसएनएलला राहिले नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे. सरकारी तारांची यंत्रणा मोडीत काढून आता तिथे ९२७०४ ४७२२८ हा खाजगी कंपनीचा नंबर कार्यान्वित झाला आहे.

बीएसएनएल कंपनीने आमच्या कॉर्पोरेट कार्यालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आम्हाला कॉपर लाईन्स बंद करून फायबर लाईन्सवर स्थलांतरित करावे लागत आहे. फायबर लाईन टाकण्यासाठी अंतर खूप जास्त आहे आणि एअर फायबरवर देखील ते व्यवहार्य नाही. असे कारण सांगून टेलिफोन क्रमांक बंद केला.

'डिजिटल इंडिया'चा हाच का चेहरा?

एकीकडे आधुनिकतेच्या बाता मारल्या जातात आणि दुसरीकडे जुन्या, विश्वासार्ह यंत्रणेची देखभाल करणे परवडत नाही म्हणून ती बंद केली जाते. हा केवळ देखभालीचा प्रश्न नसून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष आणि कामचुकारपणाचा कळस आहे. हातनूर धरणासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी बीएसएनएलची सेवा उपलब्ध नसणे हे या कंपनीच्या पतनाचा पुरावाच मानला जात आहे.

महत्त्वाची माहिती आता 'या' नंबरवर

हातनूर धरणावरील जुना बीएसएनएल क्रमांक (२७७०४४) बंद झाला आहे. आता माहितीसाठी ९२७०४ ४७२२८ या खाजगी कंपनीच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे. पावसाळ्यात धरणाच्या पाण्याची माहिती घेण्यासाठी पत्रकार, प्रशासन आणि नागरिकांची या फोनवर सतत गर्दी असायची. आता हा 'रिंगटोन' कायमचा बंद झाल्याने जळगावच्या संवादातील एक सरकारी अध्याय संपला असून खाजगीकरणाचे सावट गडद झाले आहे.

हे तेच पत्र आहे जे बीएसएनएल विभागाने हातनुर धरणाच्या अभियंता यांना दिलेले आहेत त्याचा हा मराठी मधील अनुवाद आहे....

उपविभागीय अधिकारी

सिंचन धरणे,

Hatnoor, Dharan Vasahat,

पो-तहाकली, ता-भुसावळ

विषय: टेलिफोन नंबर 02582-277044-reg

संदर्भ:- जा. क्र. क्र. पौसा/भंडार/1120/2025 दिनांक 10/10/2

उपरोक्त पत्राच्या संदर्भात, तुमचा दूरध्वनी क्रमांक 02582-277044 हा BSNL च्या कॉपर सेवेवर कार्यरत होता. आमच्या कॉर्पोरेट कार्यालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आम्हाला कॉपर लाईन्स बंद करून फायबर लाईन्सवर स्थलांतरित करावे लागत आहे. फायबर लाईन टाकण्यासाठी अंतर खूप जास्त आहे आणि एअर फायबरवर देखील ते व्यवहार्य नाही.

म्हणून आम्ही सुचवितो की हा टेलिफोन नंबर असीममध्ये रूपांतरित करावा, जेणेकरून तो नंबर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर आपोआप डायव्हर्ट होईल.

हे लक्षात घ्यावे की अर्ज दिल्यानंतरच बिल थांबवले जाईल. त्यामुळे, तुम्हाला बिल बंद करायचे असल्यास, कृपया त्यासाठी अर्ज पाठवा.

गैरसोयीबद्दल क्षमस्व...!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT