शिवप्रेमीला मारहाण भोवली; एपीआय भरत चौधरींची तडकाफडकी 'उचलबांगडी'! 
जळगाव

Jalgaon News | शिवप्रेमीला मारहाण भोवली; एपीआय भरत चौधरींची तडकाफडकी 'उचलबांगडी'!

चाळीसगावात राडा : गाडी पार्किंगच्या किरकोळ कारणावरून ६० वर्षीय वृद्धाला झाली होती मारहाण; पोलीस अधीक्षकांचा दणका

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : चाळीसगाव शहरात शिवजयंतीच्या उत्सवाचा आनंद ओसंडून वाहत असतानाच, एका पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. महाराणा प्रताप चौकात गाडी पार्किंगच्या किरकोळ कारणावरून ६० वर्षीय शिवप्रेमीला मारहाण करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक (API) भरत चौधरी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली आहे. या कारवाईमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

चाळीसगाव शहरात शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. महाराणा प्रताप चौकात कार्यक्रमाची लगबग असताना, एपीआय भरत चौधरी आणि ६० वर्षीय सदाशिव शिवाजी मराठे यांच्यात गाडी पार्क करण्यावरून शाब्दिक चकमक उडाली. पोलिसअधिकारी भरत चौधरी यांनी मराठे यांना मारहाण केली. या धक्काबुक्कीत ज्येष्ठ नागरिक असलेले मराठे जखमी झाले.

भररस्त्यात एका ज्येष्ठ शिवप्रेमीला पोलिसांकडून मारहाण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहर विकास आघाडीचे स्वीकृत नगरसेवक घुणेश्वर पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला. 'संबंधित मुजोर अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,' असा इशारा त्यांनी दिला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकूरवार यांनी तातडीने मध्यस्थी केली आणि वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून कारवाईचे आश्वासन दिले.

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. सार्वजनिक उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम सोडून जनतेशी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याला गय न करता, त्यांनी एपीआय भरत चौधरी यांची तात्काळ नियंत्रण कक्षात (Headquarters) बदली केली. चाळीसगावातील शिवप्रेमींनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT