जळगाव : भारताने गेल्या काही दशकांत शेती क्षेत्रात मोठी प्रगती केली असून अन्नसुरक्षेत स्वावलंबन मिळवले आहे. अन्नधान्यासोबत फलोत्पादनही वाढले आहे; मात्र पोषणमूल्ये जपणे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी मातीचे आरोग्य, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि खतांचा कार्यक्षम वापर आवश्यक आहे, असे प्रतिपादन दिल्ली येथील नॅशनल अकॅडमी ऑफ अॅग्रीकल्चर सायन्सेस (NAAS) चे अध्यक्ष डॉ. हिमांशू पाठक यांनी केले.
इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जैन हिल्स, गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात दीपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन झाले.
यावेळी व्यासपीठावर ISC चे अध्यक्ष डॉ. दिलीप घोष, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, शास्त्रज्ञ डॉ. एन. कृष्णकुमार, गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अय्यंगार उपस्थित होते. प्रारंभी वंदे मातरम् व ‘जय जय कृषी परिषद भारत की…’ हे आयसीएआर गीत सादर करण्यात आले. अनुभूती निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हटले. संगीता भट्टाचार्य व डॉ. व्यंकटश रमण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले, तर अजित जैन यांनी आभार मानले. उद्घाटनानंतर ‘ऑरेंज फिएस्टा’ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. हिमांशू पाठक म्हणाले, भारत एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा देश होता; आज तो निर्यातदार बनला आहे. कोविड काळात भारताने जगाला अन्नपुरवठा केला, हे शेतकरी, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. लिंबूवर्गीय पिकांमध्ये उत्पादकता घट, कीड-रोग व हवामान बदलाच्या समस्यांवर मात करण्यासाठी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना शाश्वत आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान पुरवले पाहिजे. पाणी आणि माती व्यवस्थापनामुळे बुंदेलखंडसारख्या भागात फलोत्पादन वाढल्याचे उदाहरण त्यांनी दिले.
भारत सिट्रस उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर – डॉ. दिलीप घोष
प्रास्ताविकात डॉ. दिलीप घोष यांनी सांगितले की, चीन आणि ब्राझीलनंतर भारत जगात लिंबूवर्गीय फळ उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र हवामान बदल, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, दर्जेदार रोपांची कमतरता आणि बाजारभावातील अस्थिरता ही मोठी आव्हाने आहेत. ‘भरघोस उत्पादन, हवामान बदल आणि मूल्यसाखळी व्यवस्थापन’ हा परिषदेचा मुख्य विषय असून त्यातून शाश्वत उपाय शोधले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरोग्यासाठी लिंबूवर्गीय फळांचे महत्त्व लक्षात घेता ‘स्वस्थ भारत, समृद्ध भारत’ घडवण्यासाठी संशोधन समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, असेही ते म्हणाले.
पौष्टिक अन्न पिकवू आणि देश घडवू – डॉ. एन. कृष्णकुमार
डॉ. एन. कृष्णकुमार म्हणाले, भारताने अन्नसुरक्षा मिळवली असली तरी पौष्टिक सुरक्षेत अजूनही आव्हाने आहेत. मधुमेहासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोषकतत्त्वांनी समृद्ध फळांचे सेवन वाढले पाहिजे. फलोत्पादन हे पोषणासाठी सर्वोत्तम माध्यम आहे. मान्यताप्राप्त नर्सरीतूनच रोगमुक्त रोपे घ्यावीत आणि बंदिस्त वातावरणातील मदर नर्सरीला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. मोसंबी हे उत्पादन, कालावधी आणि उत्पन्नाच्या दृष्टीने उत्तम पीक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेतकरी नवप्रेरक – डॉ. सुदर्शन अय्यंगार
विशेष अतिथी डॉ. सुदर्शन अय्यंगार म्हणाले, संशोधनासोबत नैतिकतेचा विचार होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी शेतीत केलेले बदल हे समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. भवरलाल जैन यांनी शेतकरी ते उद्योजक असा प्रवास करून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत परिवर्तनाचा विश्वास निर्माण केला, असे त्यांनी सांगितले.
संत्र्याला मूल्यवर्धित अन्न म्हणून ओळख द्यावी – अनिल जैन
अनिल जैन म्हणाले, किती उत्पादन झाले यापेक्षा शेतकऱ्याला एकरमागे किती उत्पन्न मिळाले हे महत्त्वाचे आहे. संशोधनाचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. संत्र्यासारख्या फळांना ‘सुपर फूड’ म्हणून विकसित करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी ‘सिट्रस कल्टिवेशन गाइड’ पुस्तक व परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
जैन इरिगेशनतर्फे दोन नव्या वाणांचे लोकार्पण
जैन इरिगेशन सिस्टिम्सने ‘जैन स्वीट ऑरेंज-६’ आणि ‘जैन मॅन्डरीन-१’ हे दोन नवे वाण विकसित केले आहेत. निवडक दहा शेतकऱ्यांना या वाणांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. ‘जैन मॅन्डरीन-१’ हे दुसऱ्याच वर्षी उत्पादन देणारे वाण असून नागपूर संत्र्याला चांगला पर्याय ठरू शकतो, असे डॉ. मिलिंद लधानिया यांनी सांगितले.
मान्यवरांचा फेलोशिपद्वारे गौरव
परिषदेत देश-विदेशातील नामवंत शास्त्रज्ञांना फेलोशिप प्रदान करून गौरव करण्यात आला. त्यात अमेरिका, इस्रायल तसेच भारतातील विविध संशोधन संस्थांतील तज्ज्ञांचा समावेश होता.