Narayangaon railway project
जळगाव : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्ताराला वेग आला आहे. नारायणगाव (ता. निफाड) येथे भूसंपादनाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी तब्बल २५ शेतकऱ्यांनी स्वेच्छेने सहकार्य केल्यामुळे रेल्वे विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मध्य रेल्वे च्या भुसावळ विभागाने ‘मिशन नाशिक’ अंतर्गत ही प्रक्रिया राबवली. १४ जुलै ते २५ सप्टेंबर २०२७ दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी लाखो भाविकांची अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, नवीन ट्रॅक टाकणे आणि अतिरिक्त सुविधा उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी नारायणगाव येथील जमीन अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.
मंगळवारी (दि. २४) पार पडलेली ही भूसंपादन प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि समन्वयातून पार पडली. गट क्रमांक ६५७, ६५८ आणि ६५९ मधील जमिनीचे हस्तांतरण रेल्वे अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि शेतकरी यांच्या सहकार्याने कोणत्याही वादाविना पूर्ण झाले. सामान्यतः भूसंपादन प्रक्रियेत उद्भवणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर नारायणगावातील हा अनुभव प्रशासनासाठी आदर्श मानला जात आहे.
या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचे रेल्वे प्रशासनाने विशेष कौतुक केले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे पुढील कामांना गती मिळणार असून, प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास कुंभमेळ्यादरम्यान रेल्वे वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.
या विकासकामांमुळे रेल्वेची क्षमता वाढून भाविकांना जलद प्रवासाची सुविधा मिळेल. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल. नाशिक परिसरातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे.
नारायणगावातील भूसंपादन पूर्ण होणे हे सिंहस्थाच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा मानले जात असून, आता या जागेवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. २०२७ पूर्वी सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार भुसावळ रेल्वे विभागाने व्यक्त केला आहे.