जळगाव : भडगाव तालुक्यातील पिंपरखेड तलावात दोन दिवसांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन मृतदेह एकाच ठिकाणी आढळल्यामुळे ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
शुक्रवार (दि.14) रोजी वाल्मीक संजय ह्याळींगे (वय २७) याचा मृतदेह तलावात आढळला होता. या प्रकरणी भडगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी रविवार (दि.16) रोजी सकाळी नारायण रामदास ऱ्हाळींगे (वय ५२) यांचा मृतदेह त्याच तलावात तरंगताना सापडला. सलग दोन मृत्यूंमुळे दोन्ही प्रकरणांत अपघाताची शक्यता नाकारत ग्रामस्थांनी घातपातावर ठाम संशय व्यक्त केला आहे.
दुसरा मृतदेह सापडताच ह्याळींगे परिवारातील नातेवाईक आक्रोश व्यक्त करत घटनास्थळी जमा झाले. त्यांनी मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच मृतदेहाचे ‘इन-कॅमेरा’ पोस्टमॉर्टेम करण्याच्या मागणीवर ठाम राहून त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
नातेवाईकांनी एरंडोल-भडगाव महामार्गावर रास्ता रोको केला असून तब्बल तीन तास वाहतूक पूर्ण ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी बापू रोहम, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि भडगाव पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना शांत करत त्वरित आणि निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिल्यावर रास्ता रोको मागे घेण्यात आला आहे.
दोन्ही मृत्यूंत घातपाताची शक्यता गृहीत धरून तपास गांभीर्याने करून पोलीसांनी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेवटची माहिती मिळेपर्यंत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.