जळगाव

Jalgaon Municipal : मोहाडीत महापालिकेचा 'हातोडा' थंडावला; आदिवासी बांधवांच्या तीव्र विरोधामुळे पथक माघारी

​झोपड्यांसमोर महिलांचा ठिय्या; 'आधी पुनर्वसन करा, मगच कारवाई'चा संतप्त पवित्रा

पुढारी वृत्तसेवा

​जळगाव : मोहाडी शिवारातील महापालिकेच्या मालकीच्या जागेवर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला आज आदिवासी बांधवांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला. "गेल्या २० वर्षांपासून आम्ही येथे राहतोय, हक्काचा निवारा हिरावून घेणार असाल तर याद राखा," असा इशारा देत आदिवासी महिलांनी झोपड्यांसमोरच ठिय्या मांडल्याने महापालिकेची कारवाई बारगळली. अखेर लोक संघर्ष मोर्चाच्या मध्यस्थीनंतर आणि आयुक्तांसोबत बैठकीचे आश्वासन मिळाल्यानंतर पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.

नेमका प्रकार काय?

​महापालिकेच्या मोहाडी शिवारातील आरक्षित जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार प्रशासनाकडे होती. त्यानुसार आज सकाळी महापालिकेचे पथक फौजफाट्यासह कारवाईसाठी दाखल झाले. मात्र, कारवाईची कुणकुण लागताच लोक संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी आणि शेकडो आदिवासी बांधव एकवटले. 'आमची घरे पाडण्यापूर्वी आमचे पुनर्वसन कुठे करणार?' असा सवाल उपस्थित करत रहिवाशांनी थेट जेसीबीसमोरच ठाण मांडले.

लोक संघर्ष मोर्चाची मध्यस्थी

​घटनेची माहिती मिळताच लोक संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आदिवासी बांधवांच्या व्यथा मांडल्या. २०-२० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना अचानक रस्त्यावर आणणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी रहिवासी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत, "प्राण गेला तरी चालेल, पण झोपड्या पाडू देणार नाही," अशी गर्जना केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आता चेंडू आयुक्तांच्या कोर्टात

​वाढता तणाव पाहून महापालिका अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतली. येत्या एक ते दोन दिवसांत महापालिका आयुक्त आणि रहिवाशांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या बैठकीत पर्यायी जागेबाबत किंवा अतिक्रमणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आल्यानंतर आंदोलन शांत झाले.

​"आदिवासी बांधव येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यांना पर्यायी जागा दिल्याशिवाय आम्ही एकही झोपडी पाडू देणार नाही. प्रशासनाने चर्चेतून मार्ग काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल."
— सचिन दांडे, पदाधिकारी, लोक संघर्ष मोर्चा.
​"आम्ही रात्रंदिवस मेहनत करून हा निवारा उभा केला आहे. आता अचानक महापालिका आम्हाला बेघर करायला निघाली आहे. जोपर्यंत आम्हाला दुसरी जागा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही."
रहिवासी आदिवासी महिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT