जळगाव : ‘मतदान पवित्र दान आहे,’ ‘मतदान आपला हक्क आहे,’ अशा जाहिरातींवर लाखो रुपयांची उधळण करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या जळगावातील यंत्रणेचे आज अक्षरशः धिंडवडे निघाले. प्रभाग क्रमांक ७ मधील लुंकड कन्या शाळा मतदान केंद्रावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नारायण पाटील हे नागरिक मतदान करण्यासाठी गेले असता, ‘तुमचे मतदान आधीच झाले आहे,’ असे सांगत त्यांना परत पाठवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील रहिवासी नारायण त्रंबक पाटील हे आज दुपारी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लुंकड कन्या शाळेतील केंद्रावर गेले होते. हातात ओळखपत्र आणि मनात उत्साह घेऊन ते निवडणूक अधिकाऱ्यांसमोर उभे राहिले. मात्र, यादी तपासताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, "तुमच्या नावासमोर आधीच खूण झाली आहे, तुमचे मतदान होऊन गेले आहे." हे ऐकून पाटील यांना धक्काच बसला.
"मी प्रत्यक्ष रांगेत उभा असताना, माझ्या नावावर मतदान करून जाणारा तो 'भामटा' कोण?" असा संतप्त सवाल नारायण पाटील यांनी उपस्थित केला आहे. ओळखपत्राची खातरजमा न करता निवडणूक कर्मचाऱ्यांनी दुसऱ्याच व्यक्तीला मतदान करू दिलेच कसे? असा प्रश्न आता विचारला जात आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे आणि 'आंधळ्या' कारभारामुळे एका जागृत मतदाराला आपल्या घटनात्मक हक्कापासून वंचित राहावे लागले आहे.
सकाळपासून शहरात बोगस मतदानाची चर्चा असतानाच, आता थेट एका मतदाराचा हक्कच हिरावला गेल्याने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नारायण पाटील यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या बोगसगिरीला जबाबदार कोण? याचे उत्तर प्रशासनाला द्यावेच लागेल.