नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी दिसून आली.  Pudhari News Network
जळगाव

Jalgaon Municipal Election : जळगाव जिल्ह्यात नगराध्यक्षपदाची लढाई घराणेशाहीच्या छायेत

महायुतीत अनेक ठिकाणी तणाव

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी दिसून आली. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांमध्ये घराणेशाहीचे अस्तित्व ठळकपणे समोर आले आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे दिसलेला कल आता सत्ताधारी पक्षांमध्येही स्पष्टपणे जाणवतो आहे. अनेक आमदार आणि नेत्यांनी पत्नीला किंवा कन्यारत्नाला नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरवले आहे.

  • चाळीसगाव मध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण रिंगणात आहेत. राष्ट्रवादीकडून माजी आमदार देशमुख यांच्या पत्नी पद्मजा देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

  • पाचोरा मध्ये शिवसेना (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील उमेदवार आहेत. तर माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचिता वाघ यांनी भाजपच्या उमेदवार म्हणून प्रवेश केला आहे.

  • जामनेर मध्ये स्थानिक पातळीवर प्रभावी मानल्या जाणाऱ्या नेत्याची पत्नी साधना महाजन यांना संधी दिली आहे.

  • भुसावळमध्ये भाजप नेते संजय सावकारे यांच्या पत्नी रंजना सावकारे मैदानात उतरल्या आहेत. तसेच गायत्री बंगाली यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

  • मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील यांची कन्या रंजना पाटील शिंदेसेनेकडून उमेदवार आहेत. भाजपकडून भावना महाजन रिंगणात आहेत. येथे भाजप आणि शिवसेनेत सरळ लढत दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी (शरद पवार गट) येथे मागे राहिल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी असे उमेदवार चर्चेत आहेत.

महायुतीमध्ये तणाव आणि राष्ट्रवादीचे आव्हान दिसत असून जिल्ह्यात महायुतीतील एकवाक्यता डळमळीत दिसते आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी परस्परांविरुद्ध उमेदवार उभे केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तुतारी चिन्हासह अनेक ठिकाणी थेट आव्हान देत आहे. याउलट, पारोळा आणि नशिराबाद येथे युती यशस्वी करण्यात आली आहे. नशिराबादमध्ये पहिल्याच निवडणुकीत संयुक्त ताकद दाखवण्याचा प्रयत्न आहे.

पाचोरात दोन दिग्गजांच्या पत्नी आमनेसामने असून पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांच्या पत्नींच्या विरोधात भाजपने माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नींना उमेदवारी दिल्याने येथे चुरस वाढली आहे.

पक्षापक्षात ‘सत्ता घरातच’ ठेवण्याचा प्रयत्न

या संपूर्ण चित्रातून जिल्ह्यातील अनेक नेते राजकीय सत्ता आपल्या कुटुंबातच राखण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. पूर्वी काँग्रेसवर असलेला घराणेशाहीचा ठपका आता भाजप आणि शिवसेनेलाही लागलेला दिसतो.

जळगाव जिल्ह्यातील ही घराणेशाही आणि महायुतीतील तणाव मतदार कितपत स्वीकारतात, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT