जळगाव: जळगाव शहर महानगरपालिकेच्या सत्तेचा 'रिमोट कंट्रोल' मानल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या स्थायी समितीसह महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची अखेर सोमवारी निवड करण्यात आली. पहिल्याच वर्षी कोणताही धोका न पत्करता भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटाने आपल्या अनुभवी आणि जुन्या जाणत्या शिलेदारांनाच रिंगणात उतरवत 'अनुभवा'ला प्राधान्य दिले आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीवर अपेक्षेप्रमाणे महायुतीचेच वर्चस्व दिसून आले.
सभागृहात राजकीय खलबते
महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. १६) विशेष महासभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर मनोज चौधरी, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसेवक शुक्ला उपस्थित होते. सुरुवातीला तिन्ही पक्षांनी आपापल्या सदस्यांच्या नावांची बंद पाकिटे महापौरांकडे सुपूर्द केली. महापौरांनी या नावांचे वाचन करताच सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. महापौर आणि उपमहापौरांनी पदभार घेतल्यापासून शहराच्या विकासकामांचा धडाका लावला असून, आता समित्यांच्या निवडीमुळे या कामांना अधिक गती मिळणार आहे.
संख्याबळाचे गणित (स्थायी समिती - १६ सदस्य)
भाजप: १० सदस्य (सर्वात मोठा पक्ष)
शिवसेना (शिंदे गट): ५ सदस्य
शिवसेना (ठाकरे गट): १ सदस्य
महिला व बालकल्याण समिती (९ सदस्य)
भाजप: ५ सदस्य
शिवसेना: ३ सदस्य
ठाकरे गट: १ सदस्य
आता लक्ष 'सभापती' पदाकडे
समिती सदस्यांची निवड झाल्यामुळे आता खरी लढत सभापती पदासाठी होणार आहे. विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडणार असून, येत्या काही दिवसांत पक्षश्रेष्ठींकडून कोणाचे नाव निश्चित केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनुभवी सदस्यांची वर्णी लावल्याने सभापती पदही एखाद्या 'जड' नेत्याच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
स्थायी समिती सदस्य:
भाजप : दीपक सूर्यवंशी, नितीन लढ्ढा, विशाल भोळे, डॉ. चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे, नितीन सपके.
शिवसेना : विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे, सागर सोनवणे.
शिवसेना (उबाठा) : इब्राहिम पटेल.
महिला व बालकल्याण समिती सदस्य:
भाजप: सुरेखा नितीन तायडे, रंजना विजय वानखेडे, पूजा विजय जगताप, विद्या मुकुंदा सोनवणे, गायत्री राणे.
शिवसेना: सिंधुताई कोल्हे, प्रतिभाताई देशमुख, डॉ. अमृता सोनवणे.
शिवसेना (ठाकरे गट): हिंनाबी शाकीर खान.