जळगाव : जळगाव शहराच्या सत्तेचे केंद्र असलेल्या १७ मजली महानगरपालिकेवर अखेर अपेक्षेप्रमाणे 'महायुती'चा भगवा फडकला आहे. महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपमाला काळे यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) मनोज चौधरी यांची आज जोरदार निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची निवड बिनविरोध झाली असून, दीपमाला काळे या जळगावच्या ८ व्या महिला महापौर ठरल्या आहेत. या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
अशी रंगली 'विशेष' सभा
महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या उपस्थितीत या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक ११ वाजता सभेला सुरुवात झाली. महापौरपदासाठी भाजपच्या दीपमाला काळे यांच्यासह दोन अर्ज आले होते. मात्र, ऐनवेळी एका उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्याने काळे यांचा मार्ग मोकळा झाला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दीपमाला काळे यांची महापौरपदी निवड झाल्याचे जाहीर केले. १७ मजली इमारतीच्या इतिहासातील त्या आठव्या महिला महापौर ठरल्या आहेत.
शिवसेनेच्या मनोज चौधरींची 'बिनविरोध' बाजी!
महापौर निवडीनंतर उपमहापौरपदाच्या माघारीसाठी वेळ देण्यात आला होता. मात्र, या पदासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मनोज चौधरी यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. शिंदे गटाचे मनोज चौधरी यांनी उपमहापौरपदी बिनविरोध बाजी मारल्याने महापालिकेत शिवसेनेचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
गुलाल उधळला, ढोल दुमदुमले!
निवड जाहीर होताच जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर काळे आणि चौधरी यांनी तात्काळ आपल्या चेंबरमध्ये जाऊन पदभार स्वीकारला. महापालिकेच्या बाहेर कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढली.
आमदार सुरेश भोळेंकडून शुभेच्छांचा वर्षाव
या ऐतिहासिक निवडीनंतर जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश भोळे आणि शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी नवनियुक्त महापौर व उपमहापौरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. "शहराच्या रखडलेल्या विकासकामांना आता महायुतीच्या माध्यमातून नवी गती मिळेल," असा विश्वास आमदार भोळे यांनी यावेळी व्यक्त केला. या निवडीमुळे जळगावच्या राजकारणात महायुतीची पकड अधिक घट्ट झाली आहे.