Jalgaon News file photo
जळगाव

Jalgaon News: भाजपात 'घराणेशाही'चीच सरशी; 'निष्ठवंतां'ना डावलून 'बड्यांच्या' वारसांचीच चांदी!

Jalgaon Municipal Corporation news: स्थायी आणि महिला-बालकल्याण समिती निवडीत नेत्यांच्या नातेवाईकांचा बोलबाला; 'एक व्यक्ती, एक पद' तत्त्वाचा उडाला फज्जा

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon News:

जळगाव : जळगाव महानगरपालिकेत सत्तेची समीकरणं जुळवताना भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपल्या 'जुन्या' खोडांना आणि 'बड्या' नेत्यांच्या नातेवाईकांनाच पायघड्या घातल्या आहेत. स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य निवडीत बहुतांशी चेहरे हे दिग्गज नेत्यांचे पुत्र, नातेवाईक किंवा निकटवर्तीय असल्याने कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात संताप व्यक्त होत आहे. भाजपात नेहमीच 'एक व्यक्ती, एक पद' या तत्त्वाचा ढोल बडवला जातो, मात्र जळगावच्या या निवडी पाहता हे तत्व केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

'बड्यां'चे पुनर्वसन, कार्यकर्त्यांचे काय?

स्थायी समितीच्या १६ सदस्यांमध्ये भाजपाने आपले संख्याबळ (१० सदस्य) सिद्ध केले असले, तरी निवडीत मात्र घराणेशाहीचीच छाप उमटली आहे. आमदार सुरेश भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे, माजी महापौर भारती सोनवणे यांचे सुपुत्र कल्पेश सोनवणे, माजी नगरसेविका लता भोईटे यांच्या सून मानसी भोईटे यांना संधी देऊन नेत्यांच्या वारसांचे राजकीय पुनर्वसन केल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. एवढेच नव्हे, तर संकटमोचक गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय अरविंद देशमुख आणि नुकतेच ठाकरे गटातून आलेले माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या निवडीमुळे निष्ठावंतांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे.

संख्याबळाचे गणित आणि सत्तेची खेळी

स्थायी समिती (१६ जागा): भाजप - १०, शिवसेना (शिंदे गट) - ५, शिवसेना (ठाकरे गट) - १.

महिला व बालकल्याण समिती (९ जागा): भाजप - ५, शिवसेना - ३, ठाकरे गट - १.

महिला व बालकल्याण समितीमध्येही भाजपाने 'ओळखी'च्याच चेहऱ्यांना प्राधान्य दिले आहे. सुरेखा तायडे, रंजना वानखेडे यांच्यासह गायत्री राणे यांची वर्णी लावून सुरक्षित खेळी खेळली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून (शिंदे गट) माजी महापौर सिंधूताई कोल्हे आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांची कन्या डॉ. अमृता सोनवणे यांच्या रूपाने अनुभवी आणि राजकीय वारसा असलेल्या नावांना संधी देण्यात आली आहे.

आता लक्ष 'सभापती' पदाच्या 'जड' माळेकडे!

समिती सदस्यांची नावे जाहीर झाल्याने आता खऱ्या अर्थाने 'रणकंदन' माजणार आहे ते सभापती पदासाठी. स्थायी समितीचे सभापती पद हे पालिकेतील तिजोरीच्या चाव्या मानले जाते. या पदासाठी आता दिग्गज नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात होणाऱ्या या निवड प्रक्रियेत पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अनुभवी आणि 'जड' नेत्यांच्या नावांची चर्चा असल्याने कार्यकर्त्यांमधून पुन्हा एकदा 'आपलं कोण?' असा प्रश्न विचारला जात आहे.

निवडलेले 'मानकरी' थोडक्यात:

भाजप (स्थायी): दीपक सूर्यवंशी (महानगर अध्यक्ष), नितीन लढ्ढा, विशाल भोळे (आमदारपुत्र), डॉ. चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख (महाजन समर्थक), कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे, नितीन सपके.

शिवसेना (स्थायी): विष्णू भंगाळे (जिल्हाध्यक्ष), दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे, सागर सोनवणे.

शिवसेना उबाठा (स्थायी): इब्राहिम पटेल.

महिला व बालकल्याण समिती: भाजप: सुरेखा तायडे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, विद्या सोनवणे, गायत्री राणे.

शिवसेना: सिंधुताई कोल्हे, प्रतिभाताई देशमुख, डॉ. अमृता सोनवणे.

ठाकरे गट: हिंनाबी शाकीर खान.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT