Car hits laborers Muktainagar Jalgaon
जळगाव : मुंबई-नागपूर महामार्गावर मुक्ताईनगर जवळील हरताळा फाटा परिसरात आज (दि.१२) भरधाव कारचा थरार पाहायला मिळाला. राँग साईडने सुसाट आलेल्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार मजुरांना अक्षरशः हवेत उडवले. या भीषण अपघातात चारही मजूर गंभीर जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांच्या लाठ्या आणि दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट्स आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून यामागे मोठे गौडबंगाल असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गालगत काही मजूर आपल्या कामासाठी उभे असताना, अचानक समोरून चुकीच्या दिशेने भरधाव वेगात कार आली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार थेट मजुरांच्या अंगावर गेली. धडक इतकी जबरदस्त होती की, मजूर दूरवर फेकले गेले. अपघातानंतर परिसरात एकच आक्रोश निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत अपघातग्रस्त कारची तपासणी केली असता धक्कादायक बाबी समोर आल्या. कारला पुढे आणि मागे वेगवेगळ्या क्रमांकाच्या नंबर प्लेट्स लावण्यात आल्या होत्या. तसेच गाडीच्या आत पोलिसांच्या काठ्या मिळून आल्याने ही कार कोणाची? चालक पोलीस होता की पोलिसांच्या नावाचा गैरवापर केला जात होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.चालक फरार, पोलिसांकडून नाकाबंदी
अपघात घडताच चालक गाडी सोडून घटनास्थळावरून पसार झाला आहे. मुक्ताईनगर पोलिसांनी पंचनामा केला असून फरार चालकाच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावरील अवैध वाहतूक आणि राँग साईडने वाहन चालवणाऱ्यांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.