Crime News
जळगाव : जळगावातील अल्पवयीन मुलीची कोल्हापुरात विक्री करून तिचे जबरदस्तीने लग्न लावल्याचा धक्का सहन न झाल्याने आणि मुलीच्या सासरकडील मंडळींकडून मिळणार्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे त्रस्त मुलीच्या पित्याने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना रविवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आली. यामुळेच मुलीचे अपहरण, विक्री आणि लग्नाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जळगाव येथील काही महिलांनी रोजगाराचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला नाशिक येथे आणले. त्यानंतर तिला अडीच लाख रुपये रोख व दागिने घेऊन कोल्हापूर येथील काही लोकांना विक्री केले. इतकेच नव्हे तर मुलीचे कोल्हापूर येथे जबरदस्तीने लग्नही लावून दिले. यानंतर मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याने तीचा गर्भपातही करण्यात आला. या सर्व प्रकाराला कंटाळून मुलीने कशीबशी सुटका करत घर गाठत सर्व प्रकार कुटुंबाला सांगितला.
याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी गेल्या आठ दिवसांपासून रामानंदनगर पोलिस ठाण्यात तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हा दाखल करून न घेतल्याचा आरोपही या कुटुंबीयांनी केला आहे. दुसरीकडे, मुलीला विकत घेत तिच्याशी लग्न करणारे कोल्हापूर येथील आठ ते दहा जणांकडून ‘मुलीला परत पाठवा, आमचे पैसे परत द्या’ अशी मागणी करत जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याने त्रस्त मुलीच्या पित्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
या प्रकरणात जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन संशयितांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे. रोजगाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलींची विक्री आणि लग्न लावणे हे मोठे रॅकेट असून, या प्रकरणाचा सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे.