Jalgaon Municipal OBC Women Candidates  Pudhari
जळगाव

Jalgaon Mayor Election | जळगाव महापौरपदासाठी भाजपमधील ९ रणरागिणीमध्ये चुरस : आ. भोळे, आ. चव्हाण यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

दीपमाला काळे, उज्ज्वला बेंडाळेंसह 9 मातब्बर दावेदार मैदानात

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Municipal OBC Women Candidates

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ‘ओबीसी महिला’ आरक्षण जाहीर होताच, स्पष्ट बहुमत असलेल्या भारतीय जनता पक्षात आनंदासोबतच अंतर्गत चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने ४६ जागांवर विजय मिळवला असून, त्यात तब्बल २० महिला नगरसेविकांचा समावेश आहे. मात्र आरक्षण ‘ओबीसी महिला’ असल्याने, या २० पैकी ९ ओबीसी महिला नगरसेविकांमध्ये महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

महायुतीच्या माध्यमातून मनपात कमळ फुलल्यानंतर आता महापौरपदासाठीची अंतर्गत स्पर्धा शिगेला पोहोचली आहे. भाजपकडे निर्विवाद बहुमत असल्याने महापौर भाजपचाच होणार, हे निश्चित असले तरी नेमकी संधी कुणाला मिळणार, यावरून पक्षांतर्गत लॉबिंग वेग घेत आहे. अनुभवी चेहऱ्यांसह नवख्या नगरसेविकाही फिल्डिंग लावताना दिसत आहेत.

भाजपच्या २० महिला नगरसेविका सभागृहात

या निवडणुकीत भाजपच्या महिला उमेदवारांनी लक्षणीय यश मिळवले आहे. २० महिला नगरसेविका सभागृहात दाखल झाल्या असून, त्यातील ९ जणी ‘ओबीसी’ प्रवर्गातील आहेत. त्यामुळे महापौरपदाची मदार याच ९ जणींवर आहे.

‘ओबीसी’ नऊ महिला दावेदारांची प्रतिष्ठा पणाला

आरक्षणामुळे खालील ओबीसी महिला नगरसेविका महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानल्या जात आहेत. प्रत्येकामागे वेगवेगळी राजकीय पार्श्वभूमी, अनुभव आणि नेत्यांचा पाठिंबा असल्याने चुरस अधिकच वाढली आहे.

दीपमाला मनोज काळे या सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या नगरसेविका असून, त्यांना कुटुंबाची भक्कम राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. काळे कुटुंबाचा नगरपालिकेतील प्रदीर्घ अनुभव त्यांच्या दावेदारीला बळ देतो.

उज्ज्वला मोहन बेंडाळे या भाजपच्या शहर जिल्हा महिला अध्यक्षा असून, त्या तिसऱ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यावेळी त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. संघटनात्मक कामाचा अनुभव आणि पक्षनिष्ठा ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते.

वैशाली अमित पाटील या पहिल्यांदाच नगरसेविका झाल्या असून, त्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या निकटवर्तीय गटाशी संबंधित आहेत. त्यामुळे आमदार चव्हाण यांचे वजन कोणाच्या पारड्यात पडते, यावर त्यांची संधी ठरणार आहे.

गायत्री इंद्रजीत राणे या दुसऱ्यांदा निवडून आल्या असून, त्या आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या विश्वासू मानल्या जातात. स्थानिक आमदारांचा पाठिंबा असल्याने त्यांचे नावही आघाडीवर आहे.

जयश्री सुनील महाजन या माजी महापौर असून, त्यांचा मोठा प्रशासकीय अनुभव आहे. विविध राजकीय प्रवासानंतर त्या सध्या भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या अनुभवाचा पक्ष कितपत विचार करतो, याकडे लक्ष लागले आहे.

निर्णय नेत्यांच्या हातात

एकीकडे अनुभवाचा दावा, तर दुसरीकडे पक्षनिष्ठा आणि नेत्यांशी जवळीक अशा बहुरंगी समीकरणांमध्ये महापौरपदाचा चेंडू आता थेट पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक प्रभावी नेत्यांच्या कोर्टात गेला आहे. गिरीश महाजन, आमदार भोळे आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, जळगावच्या ‘बंगल्या’वर अखेर कुणाचे वजन पडते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT