जळगाव : जुन्या प्रेमसंबंधाच्या वादातून ३९ वर्षीय विवाहित महिलेचे अपहरण करून पद्मालय परिसरातील घनदाट जंगलात दगडाने डोके ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कविता अरुण सुतार (वय ३९) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे (वय २९, रा. रेणुका नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) याला अटक केली आहे.
८ सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास कविता सुतार यांनी मुलासाठी जेवणाचा डबा तयार केला. मुलगा आंघोळ करून बाहेर आला असता कविता घरात दिसल्या नाहीत. त्यांचा मोबाईलही बंद होता. परिसर तसेच नातेवाईकांकडे शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाइल डेटाचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी एरंडोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पद्मालय परिसरातील घनदाट जंगलात कविता सुतार यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे अपहरणाच्या गुन्ह्याचे रूपांतर खुनाच्या गुन्ह्यात झाले.
तांत्रिक तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जळगाव शहरातून नरेश उर्फ आबा सोनवणे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने जुन्या प्रेमसंबंधातील वादातून कविता सुतार यांचे अपहरण करून त्यांना पद्मालयच्या जंगलात नेले. तेथे दगडाने डोके ठेचून त्यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एमआयडीसी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सपोउपनि विजयसिंग पाटील, पोहेकॉ किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, पोकॉ विशाल कोळी, किरण पाटील आणि गणेश ठाकरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.