जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये रविवार (दि.25) विमानतळ समोरील इंडस्ट्रियल पार्क या ठिकाणी 'लखपती दिदी' कार्यक्रमाबाबत संमेलन भरविण्यात येत असून यासाठी भव्य अशी तयारी करण्यात आलेली आहे. या संमेलनाला सर्वात मोठा अडथळा म्हणजे संततधार पाऊस आणि त्यामुळे मैदानात झालेला चिखल आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली असून कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांना तपासणीसाठी व सभा मंडपापर्यंत चिखलातूनच आणावे लागणार आहे.
'लखपती दिदी' कार्यक्रमात पावसामुळे अडथळे आले आहेत
कार्यक्रम स्थळी जागोजागीत पावसाचे पाणी साचले असून मैदानात सर्वत्र चिखल
'लखपती दिदी'ना बसण्यासाठी टाकले कार्पेट
'लखपती दिदी' येणार चिखलातून सभा मंडपात
रविवार (दि.25) रोजी 'लखपती दिदी' संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव येथे सकाळी अकरा वाजेला येत आहेत. कार्यक्रमासाठी भव्य असा मंडप टाकण्यात आलेला आहे. तसेच जवळपास 2100 बसेसची व्यवस्था महिलांसाठी करण्यात आलेली आहे. परंतु विमानतळाच्या समोरील प्राईम इंडस्ट्रियल या ठिकाणी होणाऱ्या सभेच्या प्रांगणात जागोजागी पावसामुळे चिखल झालेला आहे.
बसण्यासाठी करण्यात आलेल्या सेक्टर मध्ये चिखल झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्लास्टिकचे कार्पेट किंवा चटाया टाकण्यात येत आहे. तर रस्त्यावर पाण्याचा प्रवाह सुरुच असून मैदानातील पाणी चारी द्वारे बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेले बॅनर देखील पावसामुळे पडले असून काही ठिकाणी सभा असलेल्या चारही बाजूने लावण्यात आलेले पत्रे देखील शनिवार (दि.24) रात्री आलेल्या पावसासह वाऱ्यामुळे उडून गेलेले आहेत. काही ठिकाणी विद्युत प्रवाह देण्यात आलेल्या वायरी सुद्धा उघड्यावर पडल्याचे दिसून येत आहे अजूनही पावसाची रीपरीप सुरु असून पावसाच्या रिमझिम सरीत कार्यक्रमाची तयारी देखील सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.