जळगाव : महायुतीच्या व्यासपीठावर एकजुटीचे गोडवे गायले जात असतानाच त्याच युतीतील नेत्यांनी एकमेकांचे वाभाडे काढल्याने जळगावच्या राजकारणात चांगलीच ठिणगी पडली आहे. महायुतीच्या सभेतून बाहेर पडत आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर अक्षरशः तोफ डागली. उमेदवारी अर्ज बाद करण्यापासून तो पुन्हा वैध ठरविण्यापर्यंतच्या प्रक्रियेवर सवाल उपस्थित करत त्यांनी गंभीर आरोप केले. त्यामुळे महायुतीच्या एकजुटीच्या दाव्यांनाच तडा गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
महायुतीच्या सभेत मंगेश चव्हाण यांनी ‘अदृश्य शक्ती’च्या माध्यमातून अर्ज बाद झाल्याचे आणि त्याच शक्तीने तो पुन्हा वैध करून पाचोरा-भडगावची जागा बिनविरोध केल्याचे विधान केल्याचा संदर्भ देत सुमित पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ‘अदृश्य शक्तीचा आव आणण्यापेक्षा माझा फॉर्म कोणी उडवला आणि पुन्हा आणला, हे स्पष्ट कबूल केले आहे,’ अशा शब्दांत त्यांनी चव्हाण यांना सुनावले.
‘अदृश्य शक्ती’च्या आड नेमके कोण? पैशांच्या व्यवहाराचा आरोप
उमेदवारी अर्जाच्या प्रकरणाला आता राजकीय रंग चढला असून, सुमित पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला. निवडणूक अधिकारी मनोज चौधरी, डीडीआर गायकवाड आणि जॉईंट रजिस्ट्रार संभाजी निकम यांच्याशी पैशांचा व्यवहार करून अर्ज बाद करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांना त्यांनी गंभीर स्वरूप दिले असले, तरी संबंधितांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठबळामुळेच अर्ज पुन्हा वैध ठरल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात नेमके कुणाचे राजकीय वजन चालले, यावरूनही नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
स्वतःची जागा बिनविरोध करता आली नाही, दुसऱ्यांच्या बिनविरोधचे श्रेय कशाला?
मंगेश चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवताना सुमित पाटील यांनी त्यांच्या चाळीसगाव मतदारसंघातील परिस्थितीचा दाखला देत थेट राजकीय खिल्ली उडवली. स्वतःच्या मतदारसंघात विरोधकांचे अर्ज असताना स्वतःची निवडणूक बिनविरोध करता आली नाही, मग दुसऱ्यांच्या जागेचे बिनविरोध होण्याचे श्रेय घेण्याचा आव कशाला? असा सवाल त्यांनी केला.
‘दुसऱ्यांसाठी खड्डे खणणारे स्वतःच खड्ड्यात पडले,’ अशा टोलेबाजीने त्यांनी चव्हाण यांच्यावर राजकीय निशाणा साधला. या वक्तव्यामुळे दोन्ही गटांतील संघर्ष केवळ उमेदवारी अर्जापुरता मर्यादित नसून प्रतिष्ठेच्या लढाईत रूपांतरित झाल्याचे दिसत आहे.
महाजनांना साद; चव्हाणांना थेट इशारा
भाजपशी आमचे संबंध चांगले आहेत; मात्र एका व्यक्तीमुळे महायुतीत वितुष्ट निर्माण होत असल्याचा आरोप करत सुमित पाटील यांनी गिरीश महाजन यांनाही या वादात लक्ष घालण्याचे आवाहन केले. मंगेश चव्हाण यांनी दिलेल्या धमकीवजा वक्तव्यांचा संदर्भ घेत त्यांनी प्रत्युत्तरादाखल कठोर भाषा वापरली.
‘हात-पाय छाटण्याची भाषा करणाऱ्यांचे पाय छाटल्याशिवाय आम्हीही राहणार नाही,’ असा इशारा देतानाच आगामी काळात चव्हाण यांचे कथित काळे धंदे पुराव्यानिशी जिल्ह्यासमोर आणण्याची घोषणा त्यांनी केली.
महायुतीच्या सभेतूनच मित्रपक्षातील नेत्यावर झालेला हा हल्ला आता केवळ शाब्दिक वाद राहिलेला नाही. उमेदवारी अर्ज, बिनविरोध निवडणूक, कथित आर्थिक व्यवहार आणि नेत्यांची प्रतिष्ठा या सगळ्यांचा गुंता वाढत असताना महायुतीतील ही ठिणगी पुढे राजकीय वणवा पेटवणार की वरिष्ठ नेते हस्तक्षेप करून हा वाद विझवणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.