जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस शिपाई किरण बारी यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका प्रवाशाचे प्राण थोडक्यात वाचले आहे.
प्रवासी रेल्वेत चढत असताना तोल जाऊन तो खाली पडण्याच्या स्थितीत असताना किरण बारी यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला सुरक्षित खेचून बाहेर काढले. भुसावळ–सुरत पॅसेंजरमध्ये चढताना प्रवाशाचा तोल गेला आणि तो फलाट व रेल्वेच्या मधल्या जागेत पडणार होता. याचवेळी कर्तव्यावर असलेल्या किरण बारी यांनी प्रसंगावधान होत धावत जाऊन या प्रवाशाला सुखरुपपणे हलकेच बाहेर खेचले. हा प्रसंग रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. प्रवाशाला वाचवण्यासाठी स्थानकावरील इतर प्रवासी व नागरिकांनीही यावेळी धाव घेतली. लोहमार्ग पोलिसांच्या वेळेवर दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याने त्यांचे कौतुक होत आहे.