जळगाव जिल्हा pudhari file photo
जळगाव

Jalgaon Local Body Election 2025 : युती-आघाडीला स्वबळाच्या ‘बंडखोरी’चे आव्हान!

दोन्ही प्रमुख आघाड्यांसमोर इच्छुकांच्या बंडखोरीचा धोका

पुढारी वृत्तसेवा

नरेंद्र पाटील, जळगाव

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत युती (भाजप-शिंदे गट) आणि महाआघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गट) यांच्यात थेट लढत झाली असली, तरी आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये वेगळे चित्र दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी युती आणि आघाडीतील घटक पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या बंडखोरीचा धोका दोन्ही प्रमुख आघाड्यांसमोर उभा आहे.

‘युती’तच मात्र ‘प्रतिस्पर्ध्यां’शी युती नाही: आमदार किशोर पाटील

स्थानिक राजकारणातील अंतर्गत कलहाचे पहिले उदाहरण पाचोऱ्यात दिसत आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले की, ज्यांनी विधानसभेत आमच्या विरोधात लढत दिली आणि आता केवळ पक्षात प्रवेश केला आहे, त्यांच्याशी स्थानिक निवडणुकीत कोणतीही युती होणार नाही. त्यांनी दिलेला हा इशारा माजी उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या संदर्भात असल्याचे मानले जात आहे. तसेच, अपक्ष उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पाचोरा नगरपरिषदेत भाजपसोबत युती होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

BJP Incoming : भाजपमधील ‘मेगा इन्कमिंग’मुळे बंडखोरीचे सावट

गेल्या काही काळात भाजपने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नवीन नेते पक्षात सामील करून घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीत परस्परविरोधी लढलेले अनेक प्रभावशाली नेते आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर इच्छुकांची संख्या वाढली असून, जागावाटपात अनेकांना डावलले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला अंतर्गत असंतोष आणि बंडखोरीचा मोठा सामना करावा लागू शकतो. परस्परविरोधी गटांना एकत्र आणणे हे युतीसमोर मोठे आव्हान असणार आहे.

संकटमोचकांवर मोठी जबाबदारी

जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपरिषदांमधील युतीतील अंतर्गत वाद आणि बंडखोरी थोपवण्याची जबाबदारी पालकमंत्री गुलाबराव पाटील (शिंदे गट) आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर असेल. विधानसभा निवडणुकीतील यश स्थानिक स्वराज्य संस्थेत कायम ठेवण्यासाठी दोघांनाही मोठी कसरत करावी लागणार आहे. स्थानिक स्तरावर युतीचे घटक पक्ष समोरासमोर आले, तर त्याचा थेट फायदा महाआघाडीच्या उमेदवारांना होऊ शकतो.

‘घरवापसी’ आणि नगराध्यक्षपदाचे गणित

लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक आमदार आणि नेते आपल्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. भुसावळ, जामनेर, चाळीसगाव आणि पाचोरा येथे विद्यमान आमदारांच्या मंडळींना संधी मिळण्याची चर्चा आहे. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असून, “प्रत्येक पद आपल्या घरी” हे समीकरण भाजपमध्येही दिसू लागले आहे.

भुसावळमध्ये शिंदे गटाचे आव्हान तर जामनेर-शेंदुर्णीत तणाव

भुसावळमध्ये शिवसेना (शिंदे गट) मोठ्या प्रमाणात उमेदवार उतरवू शकतो, ज्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांपुढे आव्हान उभे राहील. येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखालील गट देखील स्पर्धेत उतरू शकतो. जामनेर आणि शेंदुर्णी या भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्येही इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे मोठ्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अपक्षांचा प्रभाव आणि संभाव्य समीकरणे अशी...

यावल आणि रावेर नगरपरिषदांमध्ये अपक्ष उमेदवार संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलू शकतात.

जिल्ह्यातील पक्षीय बलाबल (सद्य स्थिती):

पक्ष स्थिती अन् राजकीय कल

  • भाजप (BJP) भुसावळ, चाळीसगाव, जामनेर आदी ठिकाणी मजबूत स्थिती असून जिल्ह्यात सर्वाधिक प्रभावी पक्ष.

  • शिवसेना (शिंदे गट) भाजपसोबत युतीत असून, काही ठिकाणी स्वतंत्र ताकदीने सत्तेच्या बळावर विस्ताराचा प्रयत्न करणार

  • राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) काही नगरपरिषदांमध्ये मजबूत गट. स्थानिक नेतृत्वावर यश अवलंबून राहणार आहे तरअजित पवार गटामुळे काही ठिकाणी समीकरणे बदलली आहेत.

  • काँग्रेसची (INC) मर्यादित स्थिती असून काही ग्रामीण गटांमध्ये प्रभाव आहे.

  • उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (SS-UBT) माजी नगरसेवक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर काही ठिकाणी मजबूत आधार असून काही ठिकाणी विरोधी भूमिकेत सक्रिय आहे.

  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये युती आणि आघाडीतील एकजूट टिकते की स्वबळाचे राजकारण निर्णायक ठरते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या सर्व राजकीय परिस्थितीनुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष या राजकीय समीकरणांकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT