जळगाव : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 30,000 स्वयंसहाय्यता गट कार्यरत असून, त्यामध्ये तीन लाखांहून अधिक महिला सहभागी आहेत. या गटांसाठी चालू आर्थिक वर्षात 13,000 स्वयंसहाय्यता गटांना एकूण 340 कोटी रुपये कर्ज स्वरूपात वितरित करण्यात आले आहे.
दिनांक 26, 27 आणि 28 मार्च रोजी महिला बचत गटांसाठी विशेष कर्जवाटप कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्ह्यातील 220 बँक शाखांमध्ये हे कॅम्प सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशीच 20 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले असून, हक्क दर्शक संस्थेमार्फत 330 प्रपोजल सादर करण्यात आले आहेत. उर्वरित दोन दिवसांत 175 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेऊन नियोजन करण्यात आले आहे.
महिला बचत गटांसाठी पीएमईजीपी व पीएमएफएमई योजनांतर्गत अल्प व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. उमेद अभियानातील केडर आणि तालुका अभियान व्यवस्थापन कर्मचारी गटांना मदत करत आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील महिला बचत गटांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या उद्योग-व्यवसायाला चालना द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.