जळगाव : नाताळ, नववर्ष स्वागत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्याविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील अलवाडी येथे भरारी पथकाने छापा टाकून गोवा बनावटीच्या दारूवर महाराष्ट्र राज्याचे बनावट लेबल लावून विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणात एकास अटक करण्यात आली असून सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि नाशिक विभागाचे उपआयुक्त यू. आर. वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांनी ही विशेष कारवाई राबवली.
भरारी पथकाचे निरीक्षक अशोक तारु आणि चाळीसगावचे निरीक्षक किशोर गायकवाड यांच्या पथकाने अलवाडी येथील तिरमली वस्तीमध्ये गौतम लक्ष्मण गरुड (वय ३३) याच्या घरावर छापा टाकला. आरोपी गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या परदेशी दारूच्या बाटल्यांवर महाराष्ट्रात विक्रीसाठी आवश्यक असलेली बनावट लेबल्स आणि बूच लावून ती अधिकृत असल्याचे भासवून विक्रीसाठी सज्ज करत असल्याचे आढळून आले.
या कारवाईत विविध ब्रँड्सच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या, बनावट लेबल्स व बूच असा एकूण २,२५,१६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई निरीक्षक अशोक तारु, किशोर गायकवाड, दुय्यम निरीक्षक वाय. वाय. सूर्यवंशी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एन. व्ही. पाटील, जवान आर. टी. सोनवणे, एन. बी. पवार, आर. पी. सोनवणे, व्ही. डी. हाटकर, पी. एस. पाटील आणि व्ही. बी. परदेशी यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक अशोक तारु करत आहेत.