Jalgaon MLC Election AI photo
जळगाव

Jalgaon MLC Election | जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी ६३० मतदार बजावणार मतदानाचा हक्क

जळगाव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरूवारी (दि.१८) मतदान

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Political News

जळगाव : जळगाव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरूवारी (दि.१८) मतदान होत असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत एकूण ६३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये ३१५ महिला आणि ३१५ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) समर्थित उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे तसेच अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये काही दिवस राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजपच्या वाट्याला जागा गेल्यानंतर शिवसेना (शिंदे गट)च्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत त्यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली होती. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी मतदानाच्या काही दिवसांपूर्वीच माघार घेतल्याने महायुतीतील तणाव निवळला.

निवडणुकीपूर्वी महायुतीच्या विविध बैठका घेण्यात आल्या असून सर्व घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. तथापि, प्रत्यक्ष मतदानावेळी महायुतीतील सर्व मते एकाच दिशेने पडतात का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांना आघाडीतील सर्व घटक पक्षांची मते कितपत एकत्रित मिळतात, याबाबतही उत्सुकता आहे. तसेच अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी जिल्हाभर व्यापक प्रचार मोहीम राबविल्याने त्यांना मिळणाऱ्या मतांकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक उमेदवाराच्या मतांची आकडेवारी, विविध राजकीय गटांचा पाठिंबा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणांचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात प्रतिष्ठेची मानली जाणारी ही निवडणूक असल्याने निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT