जळगाव : एका लाखाच्या बदल्यात पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून ५ लाख २० हजार रुपये लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, या दरोड्यात वाशिम पोलीस मुख्यालयातील एका पोलीस अंमलदाराचा समावेश असल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी ही कारवाई केली.
नेमकी घटना काय?
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी जगदीश शंकर व्यास यांना एका अज्ञात इसमाने फोन करून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले होते. १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ५ लाख रुपये परत मिळतील, असे स्वप्न त्यांना दाखवण्यात आले. या आमिषाला बळी पडत व्यास यांनी आपला मुलगा पंकज याला ५ लाख २० हजार रुपये घेऊन जळगावच्या हॉटेल कमल पॅराडाईज जवळ बोलावले.
दिनांक २७ एप्रिल रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास पंकज व्यास पैसे घेऊन पोहोचला असता, आरोपींनी 'येथे पोलीस चेकिंग सुरू आहे' असे भासवून त्याला कारसह भुसावळच्या दिशेने नेले. वाटेतच भीती दाखवून त्याच्याकडील ५ लाख २० हजार रुपयांची रोकड लुटून आरोपी आपल्या बलेनो कारने फरार झाले.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपासाचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाडा येथील हॉटेल एकता जवळ थांबलेली होती. एलसीबीच्या पथकाने तातडीने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
१) प्रकाश लक्ष्मण शिंदे (४०, रा. पेनबोरी, जि. वाशिम)
२) स्वप्नील दिलीप दळवी (३३, रा. वाशिम) - (याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे).
३) भागवत दत्ताराव कष्टे (४०, रा. करडा, जि. वाशिम) - (पोलीस अंमलदार, पोलीस मुख्यालय वाशिम).
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय राहुल गायकवाड, पीएसआय शरद बागल अतुल वंजारी प्रवीण भालेराव मुरलीधर धनगर विजय पाटील नितीन बाविस्कर अक्रम शेख किशोर पाटील राहुल रगडे रवींद्र कापडणे छगन तायडे प्रवीण हिवराळे तांत्रिक गौरव पाटील मिलिंद जाधव ईश्वर पाटील प्रदीप सपकाळे यांनी यशस्वी कामगिरी केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील तपासासाठी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि साजिद मन्सुरी करत आहेत.