जळगाव: जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पुन्हा एकदा आपली 'धमक' दाखवत मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीला दणका दिला आहे. जामनेर आणि भुसावळ परिसरातून लंपास केलेल्या तीन दुचाकींसह दोन सराईत चोरट्यांना एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९) आणि दर्शन बाप्पू चव्हाण (वय १८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून चोरीचा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जामनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटार सायकली चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, जामनेरमधील काही तरुण चोरीच्या गाड्यांसह फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अनुराग सूनगत (रा. हरी ॐ नगर, जामनेर) आणि दर्शन चव्हाण (रा. संत सेवालाल नगर, जामनेर) यांना ताब्यात घेतले.
चौकशीत फुटले 'घबाड'
पोलिसी खाक्या दाखवताच दोन्ही संशयितांनी आपल्या एका साथीदाराच्या मदतीने जामनेर आणि भुसावळ परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तपासादरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून खालील ३ मोटार सायकली जप्त केल्या आहेत:
१) जामनेर पोलीस स्टेशन : गुन्हा रजि. नं. १८/२०२६ (BNS ३०३(२))
२) जामनेर पोलीस स्टेशन : गुन्हा रजि. नं. ३८/२०२६ (BNS ३०३(२))
३) भुसावळ शहर पोलीस स्टेशन : गुन्हा रजि. नं. १७७/२०२४ (BNS ३०३(२))
जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जामनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेड पीएसआय रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाडे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी आणि राहुल वानखेडे यांच्या पथकाने यशस्वी केली.