जळगाव : शेती क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या 'फाली' (FALI - Future Agriculture Leaders of India) उपक्रमाची सुरुवात "फ्युचर ॲग्रीकल्चर ऑफ इंडिया" म्हणून करण्यात आली असल्याचे वक्तव्य जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी केले.
'फाली'च्या माध्यमातून गेल्या अकरा वर्षांपासून ग्रामीण विद्यार्थ्यांना शेतीशी जोडण्याचे कार्य सुरू असून, त्यातून नवसंशोधन व वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेतीकडे पाहिले जात आहे. जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात अनिल जैन यांच्यासह चिलीचे व्हाईस चेअरमन न्यासी बेरी, आयटीसीचे एस.यू. कुमार आणि अनिल जोशी मंचावर उपस्थित होते.
अनिल जैन म्हणाले की, "'फाली' हे शेतकऱ्यांसोबतचे आणि विद्यार्थ्यांचे शेतीशी नाते घट्ट करत आहे. शाळांमधूनच शेतीची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहे. बदलत्या हवामानात शेती कशी करावी, कोणते नवे प्रयोग करता येतील यावर या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संशोधन सुरू आहे. व्यवसायिक दृष्टिकोनातूनही शेतीकडे पाहण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे."
सध्या महाराष्ट्रातील 22, गुजरातमधील 5 आणि मध्य प्रदेशातील 2 शाळांमध्ये 'फाली'च्या माध्यमातून शेतीविषयक शिक्षण व प्रयोगात्मक प्रशिक्षण दिले जात आहे. यावर्षी 15 हजार विद्यार्थी या उपक्रमाचा सहभागी झाले असून, केवळ या आठवड्यात 1100 विद्यार्थी 'फाली' उपक्रमात सहभागी झाले आहेत.
"आम्हाला फॉलोअर नव्हे, तर लीडर्स घडवायचे आहेत," असे जैन यांनी ठामपणे सांगितले. विशेष म्हणजे अर्बन भागातील मुलांसाठीही वेगळ्या पद्धतीने शेतीविषयक माहिती व प्रशिक्षण देण्याचा प्रयोग 'फाली ई' उपक्रमातून राबवला जात आहे. सध्या 'फाली'चे 80 एक्झिक्युटिव्ह संपूर्ण उपक्रमाचे संचालन करीत असून, जळगाव जिल्ह्यातील 8 शाळा या उपक्रमासाठी निवडण्यात आल्या आहेत.