Jalgaon Land Records Office Bribe Case
जळगाव : शेतजमीन मोजणीच्या ऑनलाइन अर्जातील त्रुटी दूर करून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई आणि एका सायबर कॅफे चालकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. सचिन किसन पाटील आणि राकेश रामदास चव्हाण अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. नेहते हॉस्पिटलजवळ शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) दुपारी ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार (वय ३६) यांची भुसावळ तालुक्यातील गोजोरे शिवारात शेतजमीन आहे. या जमिनीच्या मोजणीसाठी त्यांनी ५ सप्टेंबर रोजी भुसावळ येथील चव्हाण सायबर कॅफेमधून दोन हजार रुपयांचे शासकीय चलन भरून ऑनलाइन अर्ज केला होता. मात्र, ३० सप्टेंबर रोजी अर्जात त्रुटी असल्याचा संदेश त्यांना प्राप्त झाला.
याबाबत माहिती घेण्यासाठी तक्रारदारांनी सायबर कॅफे चालक राकेश चव्हाण याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील सचिन पाटील यांच्याशी बोलणे झाले असून काम करून देण्याचे आश्वासन चव्हाण याने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
१६ ऑक्टोबर रोजी राकेश चव्हाण याने तक्रारदारांना फोन करून शेतमोजणी अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी शिपाई सचिन पाटील याच्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी जळगाव एसीबी कार्यालयात धाव घेत तक्रार नोंदवली.
एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. त्यात एक हजार रुपयांची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने सापळा रचला. शुक्रवारी दुपारी सुमारे दीड वाजता जामनेर रस्त्याकडून हनुमाननगरकडे जाणाऱ्या मार्गावर नेहते हॉस्पिटलजवळ राकेश चव्हाण याने सचिन पाटील याच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून एक हजार रुपये स्वीकारले. याचवेळी दबा धरून असलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस अंमलदार किशोर महाजन, मनोज पाटील आणि प्रनेश ठाकूर यांनी या कारवाईत सहभाग घेतला