Martyr Rohit Patil : शासकीय इतमामात लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप Pudhari
जळगाव

Martyr Rohit Patil : शासकीय इतमामात लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

‘शहीद जवान अमर रहे’, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी कोळपिंप्री दुमदुमले; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पारोळा तालुक्यातील कोळपिंप्रीचे भूमिपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील लान्स नायक रोहित नारायण पाटील यांना शुक्रवारी (दि. ४) साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. रोहित पाटील यांच्या पार्थिवावर कोळपिंप्री येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना देत वीर जवानाला अखेरची सलामी दिली. ‘शहीद जवान अमर रहे’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

भारतीय सैन्य दलातील १ पॅरा (स्पेशल फोर्सेस) युनिटमध्ये कार्यरत असलेले लान्स नायक (GD) रोहित पाटील यांना १ सप्टेंबर २०२६ रोजी हरियाणातील यमुनानगर येथील हथिनीकुंड बॅरेज परिसरात सुरू असलेल्या लष्करी सरावादरम्यान वीरमरण आले. सैन्याच्या प्रत्यक्ष मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या डायव्हिंग आणि हेलोकास्टिंग प्रशिक्षणात ते सहभागी झाले होते. चिनूक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरू असलेल्या या सरावादरम्यान पाण्याखालील डायव्हिंग आणि हेलोकास्टिंग प्रशिक्षण घेत असताना त्यांना वीरमरण आले.

शहीद लान्स नायक रोहित पाटील यांचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास लष्करी वाहनातून त्यांच्या मूळ गावी कोळपिंप्री येथे आणण्यात आले. पार्थिव गावात दाखल होताच कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहीद रोहित पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. आमदार अनिल पाटील आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानाला अभिवादन केले. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रोहित पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सायंकाळी सातच्या सुमारास रोहित पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पारोळा पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. तसेच भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना देत वीर जवानाला अखेरची सलामी दिली.

यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निलेश पाटील, पारोळा तहसीलदार उल्हास देवरे, सैनिक कल्याण संघटक विश्वनाथ उगले, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी, एनसीसीचे विद्यार्थी, सैनिक शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लान्स नायक रोहित पाटील यांच्या बलिदानाने कोळपिंप्रीसह संपूर्ण पारोळा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. देशसेवेसाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानाच्या शौर्याला आणि त्यागाला जिल्हावासीयांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT