जळगाव

Jalgaon Kidnapping Case | अपहरण करून डांबून ठेवलेल्या तिघांची सुखरूप सुटका, चौघांना छत्तीसगडमधून अटक

गणेश सोनवणे

जळगाव- शहरातील एका व्यापाऱ्याच्या नातेवाईक व मित्रांना अपहरण करून अज्ञात व्यक्तींनी छत्तीसगड जिल्ह्यात घेऊन गेले होते. खंडणी मागितल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. तीनही अपहरण व्यक्तींची सुटका केली आहे. अपहरण करणाऱ्या चार जणांना छत्तीसगड जिल्ह्यातील लॉजमधून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

नेमके प्रकरण काय?

  • सागर कमल लुल्ला (वय २४, रा. नवजीवन सोसायटी, भुसावळ) यांचे जळगाव शहरात शेअर मार्केटिंगचे सिंधी कॉलनी परिसरात दुकान आहे.
  • त्यांचे नातेवाईक व मित्रांना अज्ञात व्यक्तींनी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील साई सिटी येथून अपहरण करून अज्ञात व्यक्ती यांनी पळवून नेले होते.
  • दरम्यान सदरहू अज्ञात व्यक्तींनी वेळोवेळी फिर्यादी व्यापारी सागर लुल्ला यांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना फोन करून सुरुवातीला २५ लाख नंतर ८ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

 खंडणीची केली मागणी

या प्रकरणी अपहरण करणाऱ्या संशयित आरोपींनी सुरुवातीला १ लाख २० हजार व नंतर ७० हजार असे १ लाख ९० हजार रुपये खंडणी म्हणून स्वीकारले होते. एमआयडीसी पोलीस स्टेशन समोर हे मोठे आव्हान उभे ठाकले होते.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अपहरण करणारी व्यक्ती अनोळखी असल्याने तसेच अपहरण झालेल्या व्यक्तींचे मोबाईल फोन बंद येत असताना देखील एमआयडीसी पोलिसांनी त्यांचे कौशल्य आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत अपहरण झालेल्या इसमांची माहिती काढली. हे सर्वजण छत्तीसगड येथे गेले असल्याचे समजल्याने त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला. सदर घटनेतील तीन अपहरण झालेले व्यक्ती आणि अपहरण करणारे व्यक्ती हे छत्तीसगड येथील राजनांदगाव येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली.

अपहृतांची सुटका, अपहरणकर्त्यांना अटक

राजनांदगाव येथे १० ते १२ तास शोध घेतल्यानंतर तसेच हॉटेल व लॉजेस तपासल्यानंतर एका हॉटेलमध्ये सात व्यक्ती संशयितरित्या थांबून असल्याची माहिती मिळाली. तेथे जाऊन पाहणी केली असता अपहृत झालेले रोहित कैलास दर्डा, विशाल अनिल शुबवाणी, अजय ठाकरे हे दिसून आले. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे अपहरण करणारे अश्विनी हरीश कुमार माखीजा (वय ३६, रा. रायपूर, छत्तीसगड), संजय आरतमनी मिश्रा (रा. रसूलहा ता. थाडपट्टी जि. प्रतापगड उत्तर प्रदेश), दिलीप शेषनाथ मिश्रा (रा.रायपूर, छत्तीसगढ), आनंद श्रीतीर्थराज मिश्रा (रा. लखनऊ तेलीबाग, उत्तर प्रदेश) चार संशयित आरोपी देखील मिळून आले. अपहृत झालेल्या व्यक्तींना अपहरण करणाऱ्यांच्या ताब्यातून पोलिसांनी सुखरूप सोडवित अपहरण करणाऱ्यांना अटक केली. त्यांच्यावर गंभीर खुनासारखे गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सर्वांना ताब्यात घेऊन जळगावात आणले. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस नाईक किशोर पाटील, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, किरण पाटील, चंदू पाटील, गणेश ठाकरे यांनी केलेली आहे.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT