robbery case Pudhari
जळगाव

Jamner Theft Case | 'पैसे पडलेत' असं सांगून बांधकाम व्यावसायिकाला लुटलं; डिक्कीतून ६ लाख गायब

जामनेरमध्ये भरचौकात फिल्मी स्टाईल चोरी; दुचाकीस्वार भामट्यांचा सुळसुळाट

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Jamner Builder Looted Jalgaon

जळगाव : 'तुमचे पैसे पडले आहेत' असे सांगून लक्ष विचलित करायचे आणि लाखो रुपये लंपास करायचे, हीच जुनी 'मोडस ऑपरेंडी' वापरत जामनेरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाला तब्बल ६ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. बँक ऑफ इंडियातून रक्कम काढून जात असलेल्या व्यावसायिकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी ही रक्कम लंपास केली. या घटनेमुळे जामनेर शहरात खळबळ उडाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोपऱ्यावर घातला दरोडा!

गणपती नगरमधील बांधकाम व्यावसायिक प्रभाकर रामदास सुरळकर यांनी वाकी रोडवरील स्टेट बँकेतून ६ लाख रुपयांची रोकड काढली. ही रक्कम त्यांनी आपल्या दुचाकीच्या (क्र. MH 19 DN 1893) डिक्कीत ठेवली. जळगाव रोडने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोपऱ्यावरून जात असताना, पाठीमागून आलेल्या अज्ञात भामट्याने "तुमचे पैसे खाली पडले आहेत," असे सुरळकर यांना सांगितले.

सुरळकर यांनी गाडी थांबवून पाहताच, चोरट्याने संधी साधून डिक्कीतील ६ लाखांची बॅग गायब केली आणि दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हेडकॉन्स्टेबल प्रतापसिंग मथुरे पुढील तपास करत आहेत. व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बोदवडमधील कोल्हाडीत भरदिवसा घरफोडी; शेतकऱ्याची १ लाख २९ हजारांची पुंजी लंपास

जळगाव : बोदवड तालुक्यातील कोल्हाडी येथे भरदिवसा एका शेतकऱ्याच्या घरात घुसून अज्ञात चोरट्याने १ लाख २९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (दि. २५) सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान, अवघ्या एका तासाच्या अवधीत हा डल्ला मारण्यात आला. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरसकाळी घर गाठले अन्...

कोल्हाडी येथील रहिवासी आणि शेतकरी राजेंद्र नारायण डाके हे नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. रूममध्ये ठेवलेल्या चौकोनी स्टीलच्या डब्यावर चोरट्याने अचूक हात मारला. या डब्यात ठेवलेली ८५ हजार रुपयांची रोकड आणि तोळाभराची सोन्याची गोम, मण्यांची पोत, ३ ग्रॅमचे मंगळसूत्र, कर्णफुले, लहान मुलांची अंगठी आणि बाळ्या असा एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटा पसार झाला. डाके यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष चौधरी करत आहेत. चोरट्यांच्या या धाडसामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT