जळगाव : शहरातील नशेमन कॉलनीतील के जी एन डेअरी जवळील एका घरातून अज्ञात चोरट्याने दरवाजा उघडून २ अॅपल कंपनीचे आयफोन व १ वन प्लस कंपनीचा मोबाईल, असे सुमारे २ लाख किमतीचे फोन चोरुन पोबारा केला होता. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी २४ तासात संशयीत अल्पवयीन आरोपीला मुद्देमालासह जेरबंद केले आहे.
नशेमन कॉलनीत तन्वीर मजहर पटेल हे कुटुंबासह राहतात. दि. १८ रोजी रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास घरातील सर्व झोपेत असताना अज्ञात चोरट्याने घराचा बंद दरवाजा उघडला. घरातून २ अॅपल कंपनीचे आयफोन व एक वन प्लस कंपनीचा, असे २ लाख रू. किमतीचे मोबाईल फोन चोरुन नेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला १९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. डी बी पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घराच्या आसपासच्या नागरीकांकडे चौकशी केली. गोपनिय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहीती घेतली असता फिर्यादी तन्वीर मजहर पटेल याच्या घराजवळ एक अल्पवयीन मुलगा फिरत असल्याचे दिसून आले. त्या माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. पोलिसांनी त्याच्याकडील चोरीचे फोन हस्तगत केले. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे डी बी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पो हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, पो को किरण पाटील, छगन तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकुर, योगेश बारी, योगेश घुगे यांनी या प्रकरणाचा तपास केला.