जळगाव : महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलत जिल्हा नियोजन समितीच्या सहा कोटींच्या निधीतून जळगाव शहरातील महाबळ रोडवर उभारलेले आधुनिक व नावीन्यपूर्ण महिला व बालकल्याण भवन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवार (दि. 15) रोजी लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांसह मान्यवर उपस्थित होते. राज्यात रोल मॉडेल ठरेल असे हे महिला व बालकल्याण भवन अठरा महिन्यांत पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे एकाच छताखाली सात कार्यालये कार्यरत झाली आहेत.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय
बालविकास प्रकल्प अधिकारी (जळगाव शहरी व दक्षिण प्रकल्प)
जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कक्ष
महिला सक्षमीकरण केंद्र
‘चाईल्ड लाईन’
महिला सक्षमीकरणासाठी कृतीशील उपक्रम राबवले जात आहेत. जिल्ह्यातील महिलांसाठी 11 ‘बहिणाबाई मार्ट’ सुरू होणार असून, त्यामुळे बचतगटांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. यावेळी भवन उभारण्यात हातभार लावलेल्या कारागिरांच्या कौशल्याचा विशेष गौरव करण्यात आला.