जळगाव : दिपनगर येथील 660 मेगावॅट वीज प्रकल्पातून रुग्णवाहिकेमधून भंगार साहित्याची चोरी होत असताना एम एस एफ च्या जवानांनी संशयित आरोपीला रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही रुग्णवाहिका भाजपा तालुका अध्यक्ष यांनी भाडे तत्वावर चालवायला दिली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिपनगर येथील 660 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पामध्ये भाजपाचे भुसावळ तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर दिली आहे. मात्र या रुग्णवाहिकेतून प्रकल्पातील भंगार चोरी होत असल्याची माहिती एम एस एफ च्या जवानांना मिळाली.
त्यानुसार प्रकल्पातील सुरक्षारक्षकांनी एम एच 15 जी बी 76 16 या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची तपासणी एम एस एफ सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रवीण खैरे रोहिदास महाजन विनोद पवार प्रवीण पाटील यांनी तपासणी केली असता रुग्णवहिनीकेतून पाच हजार रुपये किमतीच्या फायबर टाकी, 1800 रुपये किमतीचे नट बोल, 640 रुपये लहान नट बोल, 400 रुपयाचे एक लोखंडी प्लेट, 400 रुपयाची लोखंडी पाईप, 120 रुपयाचा एक लहान लोखंडी पाईप, 400 रुपये सी चॅनल, 480 रुपयाचा अँगल, 120 रुपयाचा एक लहान अँगल असे एकूण 12 हजार 960 रुपये किमतीचे साहित्य मिळून आले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्थानकात रुग्णवाहिका चालक शशिकांत भागवत चौधरी (वय 49 रा. फुलगाव तालुका भुसावळ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश दराडे हे पुढील तपास करीत आहेत.