Illegal Sand Transport Jalgaon
जळगाव : जिल्ह्यातील वाळू ठेके पावसाळ्यापूर्वीच बंद करण्यात आले असतानाही अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. जिल्हा पोलिस दलाने २२ आणि २३ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी धडक कारवाई करत ५७ ब्रास वाळूसह सात वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण ५१ लाख ५७ हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२३ ऑगस्ट रोजी मारवड आणि चोपडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. तर २२ ऑगस्ट रोजी यावल, नशिराबाद, जळगाव तालुका आणि भुसावळ तालुका परिसरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत पाच ट्रॅक्टर, एक पिकअप व्हॅन आणि टाटा कंपनीचा १२ चाकी ट्रक पोलिसांनी जप्त केला. संबंधित वाहनांमधून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने मंजूर केलेल्या ११ वाळू ठेक्यांपैकी सर्व ठेके पावसाळा सुरू होण्यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या वाळू उत्खनन किंवा वाहतुकीला परवानगी नसतानाही काही ठिकाणी गावरान भागात अवैधरीत्या वाळूचा साठा करून तिची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
काही भागांत नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे.
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांकडून कारवाई होत असली तरी, या प्रकाराला आळा घालण्यासाठी महसूल विभागाची भूमिका अधिक सक्रिय होण्याची गरज व्यक्त होत आहे. पोलिसांनी वाळू आणि वाहने जप्त केल्यानंतर महसूल विभागाकडून पंचनाम्याची प्रक्रिया केली जाते. मात्र, केवळ वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी अवैध वाळू उत्खननाच्या मुळावरच घाव घालण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील नदीपात्रे, गावरान भाग आणि वाळू घाटांवर महसूल व पोलिस विभागाने संयुक्तपणे सातत्याने गस्त आणि तपासणी केल्यास अवैध वाळू उपसा व वाहतुकीला आळा बसू शकतो.
गेल्या दोन दिवसांतील पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. आगामी काळातही अशाच प्रकारची सातत्यपूर्ण कारवाई होते का, याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.