जळगाव : शहरालगतच्या तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध कारवायांचे सत्र सुरूच आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या (SDPO) पथकाने वाघनगर परिसरात अवैध वेश्या व्यवसाय उघडकीस आणला असून, तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने पुन्हा एकदा स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.
यापूर्वी जळगाव पोलीस ठाणे हद्दीत अपर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. काही महिन्यांच्या अंतराने सलग दोन गंभीर अवैध कारवाया उघडकीस आल्याने, स्थानिक पोलिसांच्या कारवाई बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
वाघनगर परिसरात अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती SDPO यांच्या पथकाला मिळाल्यानंतर अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही कारवाई थेट उपविभागीय अधिकाऱ्यांनी केल्यामुळे, स्थानिक पोलिसांकडून घेण्यात येणाऱ्या भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
बोगस कॉल सेंटर आणि आता वेश्या व्यवसाय या दोन्ही गंभीर घटनांनी तालुका पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांच्या हद्दीतच अवैध धंदे सुरू राहणे आणि त्याबद्दल त्यांना माहिती नसणे, याबाबत नागरीकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. या भागातील गुन्हेगारी हालचालींबाबत पोलिसांना माहिती असणे अपेक्षित असतानाही, अशा घटना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकातूनच उघड होतात, हे निश्चितच चिंताजनक आहे.
स्थानिक पातळीवर हप्तेखोरी, संगनमत किंवा जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या घटनांमागे कोणाचा वरदहस्त आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तालुका पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार उघड होणाऱ्या अवैध धंद्यांवरून स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष उघड होत आहे. काही महिन्यांपूर्वी रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबारानंतर तिथेही अशाच प्रकारचा वेश्या व्यवसाय उघडकीस आला होता. यावरून शहरातील अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याचे समोर येण्याचा संभाव्य शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ या धंद्यांवर कारवाई करणे पुरेसे नाही, तर स्थानिक पोलिसांची भूमिका आणि त्यांच्या निष्क्रियतेचीही चौकशी करणे महत्वाचे असल्याचे नागरीकांकडून सांगितले जात आहे.