जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. प्रियंका खुशाल भदाणे (वय अंदाजे २८) असे मृत महिलेचे नाव असून, पती खुशाल भदाणे याला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, भदाणे कुटुंब जारगाव येथे नुकतेच राहायला आले होते. पती खुशाल याला पत्नी प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून रविवारी (दि.२०) पहाटे दोघांमध्ये तीव्र वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात खुशालने घरातील चाकूने प्रियंकाच्या गळ्यावर आणि पोटावर सपासप वार केले. या हल्ल्यात प्रियंका रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीचा जीव घेतल्यानंतर आरोपी खुशालने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र शेजारी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला वेळीच रोखण्यात आले. पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी मृत प्रियंकाच्या मावशीने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात आरोपी पती खुशाल भदाणे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ पुढील तपास करत आहेत.