जळगाव : रावेर तालुक्यात आज (दि. २४) दुपारी झालेल्या अचानक आणि तुफानी मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुक्याची दाणादाण उडाली आहे. अवघ्या काही तासांत तब्बल १२० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून, यामुळे १२ ते १३ गावांचा संपर्क तुटला आहे. अहिरवाडी येथे जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळल्याने आणि अभोडा येथे पुलावरून पाणी वाहिल्याने शेकडो विद्यार्थी शाळेतच अडकल्याची थरारक घटना घडली. सुदैवाने, गावकरी आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून मोठी दुर्घटना टळली आहे.
अहिरवाडी येथे मुसळधार पावसामुळे जिल्हा परिषद मराठी शाळेची संरक्षक भिंत अचानक कोसळली. मुसळधार पाऊस आणि भिंत कोसळल्याने विद्यार्थी शाळेतच अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकरी, ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवून सुखरूप घरी पोहोचवण्यात आले. याच गावात पुराच्या पाण्यात ३ ते ४ म्हशी वाहून गेल्या होत्या, मात्र स्थानिक नागरिकांनी जीवाची बाजी लावून त्यांनाही सुखरूप बाहेर काढले.
अभोडा-जिन्सी पुलावरून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत असल्याने कोणताही धोका पत्करू नये म्हणून 'अभोडा माध्यमिक विद्यालया'तील विद्यार्थ्यांना प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळेतच थांबवून ठेवले होते. पुलावरील पाण्याचा वेग ओसरल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले.
निंभोर सीम ते विटवा गावाच्या नदीवरील पुलाला मोठा खड्डा पडल्याचे समोर आले आहे. हा पूल कधीही ढासळण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. पुलावरील सर्व प्रकारची रहदारी तातडीने बंद करण्याचे आदेश सरपंच, पोलीस पाटील आणि स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात आले आहेत.
या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नेहते, पातोंडी, तामसवाडी आणि अभोडा या गावांचे रस्ते पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तामसवाडी-बोरखेडा पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्गही ठप्प झाला होता. तसेच, रावेर शहरात एका घराची पडझड होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
"रावेर परिसरात आज १२० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण तालुक्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष असून, सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्राची पूर्ण पाहणी करून तातडीने नुकसानीचे पंचनामे व अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत."— नायब तहसीलदार, रावेर.